News Flash

आमदार बाळू धानोरकरांचा सेनेला ‘जय महाराष्ट्र’

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून विशाल मुत्तेमवार यांचे नाव समोर आले होते.

शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आज सायंकाळी विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला

मुत्तेमवारांची माघार

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील  शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आज सायंकाळी विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  दरम्यान आपण लोकसभा निवडणुक लढणारच असे त्यांनी सांगितले.

 ते काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात.

धानोरकर पक्ष नेतृत्वावर नाराज होते. ही नाराजी त्यांनी नागपूर व चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलूनही दाखवली होती. मात्र त्यांच्या नाराजीकडे शिवसेना नेतृत्वाने दुर्लक्ष केले. तेव्हापासून ते शिवसेनेत प्रचंड अस्वस्थ होते. दरम्यान, त्याच काळात त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली.

काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार,  जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या माध्यमातून  प्रयत्नही केले. मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा तथा आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास सांगितले. लोकसभेची उमेदवारी जाहीर करा, त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊ, असा आग्रह धानोरकर यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. मात्र मंगळवारी काँग्रेसने चंद्रपूरमधून विशाल मुत्तेमवार यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून समोर केले. मुत्तेमवार याचे नाव जाहीर होताच  अवघ्या काही तासात त्यांच्या नावाला तीव्र विरोध झाला. या सर्व राजकीय नाटय़ानंतर आज सायंकाळी अचानक  धानोरकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा आणि जिल्हाध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला.

त्यामुळे जिल्हय़ात पून्हा नव्या राजकीय चर्चेला पेव फुटले आहे. आपण लोकसभा निवडणूक लढणारच आहे असे धानोरकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. काँग्रेसच्या उमेदवारीवर लोकसभा लढणार काय असे विचारले असता, आपण काँग्रेसकडे गेलो नाही, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून विशाल मुत्तेमवार यांचे नाव समोर आले होते. मात्र कॉंग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा विरोध बघता मुत्तेमवार यांनी माघार घेतली आहे. तसे आपण पक्ष नेतृत्वाला कळवले असल्याचेही विशाल मुत्तेमवार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

काँग्रेसचा उमेदवार उद्या ठरणार

चंद्रपूर लोकसभेसाठी कॉग्रेस उमेदवाराचा निर्णय २२ मार्च रोजी सकाळी होईल अशी माहिती विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. दरम्यान वडेट्टीवार-धानोरकर-सुभाष धोटे यांनी बुधवारी एकत्रित नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पून्हा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:30 am

Web Title: lok sabha election 2019 chandrapur mla balu dhanorkar left shiv sena
Next Stories
1 किस्से आणि कुजबुज : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच स्वागत
2 युती किंवा आघाडीला पाठिंबा नाही
3 परप्रांतीय गायींचा जळगावमधील चाऱ्यावर डल्ला
Just Now!
X