एक्क्याणव ऐवजी ‘नव्वद एक एक्क्याणव’ असा बदल केल्याने गणित सोप्पं होईल हा बालभारतीचा दावा ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांनी फेटाळून लावला आहे. फेसबुक तसेच ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ८४ टक्के वाचकांनी बालभारतीय संख्यानांमांमध्ये केलेल्या बदलामुळे लहान मुलांना गणित शिकणे सोप्पे होणार नाही असे मत व्यक्त केले आहे.

बावीस, बेचाळीस या संख्यानामांऐवजी आता वीस दोन, चाळीस दोन अशा बालभारतीच्या पुस्तकात सुचवण्यात आलेल्या नव्या पर्यायामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे दुमत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच या वादावर पडदा टाकत ‘कोणतीही संख्यानामे हद्दपार झालेली नाहीत. बावीस, बेचाळीस अशी जुनी संख्यानामे बदलण्यात आलेली नाहीत. विद्यार्थ्यांना सांख्यिकी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अजून एक पर्याय सुचवण्यात आला आहे,’ असे स्पष्टीकरण बालभारतीच्या गणित समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी केले आहे. तरीही या प्रकरणावरुन सामन्यांमध्ये चर्चा सुरुच आहे. बहुतांश लोकांना बालभारतीचा हा निर्णय पटलेला नसल्याचे समाज माध्यमांवरुन दिसून येत आहे. याचसंदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या सर्वेक्षणामध्येही जनमत बालभारतीच्या या नव्या बदलांच्या विरोधात असल्याचे दिसून आहे.

‘एक्क्याणव ऐवजी ‘नव्वद एक’ अशा बदलांमुळं गणित सोप्पं होईल का?’, असा प्रश्न ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांना फेसबुक तसेच ट्विटवरुन विचरण्यात आला होता. फेसबुकवर या प्रश्नाला ८ हजार ६०० वाचकांनी आपले मत नोंदवले आहे. त्यापैकी ७ हजार २०० जणांनी म्हणजेच ८४ टक्के वाचकांनी या निर्णयाचा गणित सोप्पं होण्यास फायदा होणार नसल्याचे मत नोंदवले आहे. तर या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गणित शिकण्यास फायदा होईल असं मत १ हजार ३०० म्हणजे १६ टक्के वाचकांनी व्यक्त केले आहे.

ट्विटवर याच प्रश्नाला १ हजार २३ वाचकांनी उत्तर दिले असून त्यापैकी ८६ टक्के वाचकांनी या निर्णयाने गणित सोप्पं होणार नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर या निर्णयाचा फायदा होईल असं मत १४ टक्के वाचकांनी व्यक्त केले आहे.

या निर्णयावरुन वाद होत असला तरी कोणतीही संख्यानामे किंवा जुन्या पद्धतीचे संख्यावाचन हे हद्दपार करण्यात आलेले नाही. आता प्रचलित असणारी संख्यावाचनाची पद्धत कायमच राहणार आहे, असे स्पष्टीकरण बालभारतीच्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी दिले आहे.