देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत आहे. मात्र करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे धास्ती वाढली आहे. त्यामुळे करोनाची तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यातही करोना रुग्ण संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे.  एकीकडे रुग्णसंख्येत घट होत असताना तितक्याच प्रमाणात नवे रुग्णही आढळून येत आहेत. राज्यात आज एकूण ८ हजार ५६२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५७ लाख ९० हजार ११३ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९५.९१ टक्के इतकं झालं आहे. असं असलं तरी आज नव्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. आज राज्यात ९ हजार ९७४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात १४३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के एवढा आहे. आता राज्यात १ लाख २२ हजार २५२ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत करोना रुग्णसंख्येत घट

मुंबईत गेल्या २४ तासात ७४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार २९५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ८२ वर पोहोचली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ टक्के इतकं आहे. सध्या मुंबईत ८ हजार ५८२ सक्रिय रुग्ण आहे. तर रुग्ण दुप्पटीचा वेग ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. २० जून ते २६ जून दरम्यान करोना रुग्ण वाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता.

देशातील करोना रुग्ण स्थिती

मागील २४ तासांत देशभरात ५० हजार ४० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५७ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, १ हजार २५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०२,३३,१८३ झाली आहे. आजपर्यंत २,९२,५१,०२९ रूग्ण बरे झाले असून, ३,९५,७५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव केसेसची संख्या ५,८६, ४०३ झाली आहे. देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७५ टक्के आहे. दरम्यान, देशात जून महिन्यात करोनाच्या रोज १८ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४० कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली आहे.