राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी याचा अर्थ आम्ही भाजपासोबत कधीच जाणार नाही असा होत नाही, असं खळबळजनक विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नुकतंच केलं होतं. मात्र, त्यांचं हे विधान वैयक्तिक असल्याचे सांगत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याबाबत मनोहर जोशींनी केलेले विधान हे त्यांचं वैयक्तिक विधान असून शिवसेनेची ती अधिकृत भुमिका नाही. त्यांच्या पिढीच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या भावना असणं हे स्वाभाविक आहे.”

महाविकास आघाडीच्या सरकारवर भाष्य करताना मनोहर जोशी म्हणाले, “मला स्वतःला असं वाटतं की, छोट्या मोठ्या गोष्टींवरुन आपसांत झगडा करण्यापेक्षा काही सहन करावं काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. पण एकत्र काम केलं तर तिघांच्याही फायद्याचं ठरेल, अशी मला खात्री वाटते.”

शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला दुरावा आणि संभाव्य शक्यतांवरही जोशी यांनी खळबळजनक भाष्य केलं. ते म्हणाले, “ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या निमित्तानं अशा गोष्टी घडत असतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झालंय. पण याचा अर्थ आम्ही भाजपासोबत कधीच जाणार नाही असा होत नाही. योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे योग्य भूमिका घेतील ही माझी खात्री आहे.”