मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी काढण्यात येणार होती. मात्र प्रशासनाने पुणे पदवीधर मतदार संघांची निवडणुकीचे कारण पुढे करत मराठा समाजातील काही कार्यकर्ते वाहनातून मुंबई ऐवजी पुण्याला गेले. दरम्यान,पंढरपुरात सकाळपासून मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून घोषणाबाजी केली. तसेच संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले. पंढरपुरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश जुगारून मराठा बांधवांचे आंदोलन शांततेत पार पडले.
सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपुरात संचारबंदी,जमावबंदी,एस टी बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले.असे असले तरी आंदोलनाच्या दिवशी सकाळी मराठा समजातील बांधव आणि भगिनी शहरातील छत्रपती शिवाजी महराज चौक येथे एकत्र आले. यावेळी आरक्षण मिळाले पाहिजे. एक मराठा लाख मराठा सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर काही मोजके आंदोलनकर्ते यांनी संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायी निघाले. या ठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले.सध्या पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पायी न जाता वाहनाने जावे असे प्रशासनाने सांगितले. त्या प्रमाणे १० वाहनातून मराठा बांधव पुण्याला रवाना झाले. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ३१ सपोनी आणि उपनिरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी, एक एसआरएफ तुकडी असा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. शहरातील अनेक दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,प्रांताधिकारी सचिन ढोले,तहसीलदार वैशाली वाघमारे उपस्थित होते.एकंदरीत हे आंदोलन शांततेत पार पडले.