आमदार नितेश राणेंचा इशारा
गुजरातमध्ये पटेल समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी हार्दिक पटेलने ज्या पद्धतीने प्रखर आंदोलन करून सरकारला नमविले, त्याच पद्धतीने मराठा आरक्षणासाठी आपण लवकरच तीव्र आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडू. या प्रश्नावर ठाकरे कुटुंबीयांनाही अंगावर घेण्याची आपली तयारी आहे, असे स्वाभिमान संघटनेचे नेते, आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
मराठा आरक्षण प्रश्नावर शुक्रवारी सोलापुरात आयोजिलेल्या एल्गार मेळाव्यासाठी आमदार राणे आले होते. त्या वेळी एका पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नासह राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार, आगामी महापालिकांच्या निवडणुका आदी मुद्यांवर भाष्य केले. राज्यसभेवर आपले वडील नारायण राणे यांना काँग्रेसने संधी देण्याची मागणी त्यांनी केली.
मराठा आरक्षण प्रश्नावर आपण आतापर्यंत दहा एल्गार मेळावे घेतले असून आणखी पंधरा मेळावे घेतल्यानंतर पुढे अचानकपणे कोणत्याही क्षणी प्रखर आंदोलन छेडले जाईल. यात सरकारला पळता भुई थोडी करू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. मराठा आरक्षणाला ठाकरे घराण्याचा विरोध आहे. परंतु त्यासाठी ठाकरे घराण्याला अंगावर घेण्याची आक्रमकता आपण ठेवल्याचे त्यांनी नमूद केले. आपले वडील नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले होते. परंतु आता फडणवीस सरकारने हे आरक्षण हिसकावून घेतले आहे. यात सरकारची मराठा समाजाविषयी विद्वेषाची भावना दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.