News Flash

दोघांच्या भांडणात जनतेची स्थिती “आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना” – मनसे

राजकीय भांडणावर मनसेने साधला निशाणा.

स्थलांतरित मजुरांसाठी ट्रेन उपलब्ध करुन देण्याच्या मुद्दावरुन सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राजकारण रंगलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन मिळत नसल्याचा मुद्दा मांडला होता. त्याला राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

राज्य आणि केंद्रामध्ये सुरु झालेल्या या राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या भांडणात जनतेची स्थिती म्हणजे “आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना” अशी झालीय असं टि्वट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल हव्या तितक्या ट्रेन मिळत नसल्याच्या मुद्दासह केंद्राकडून जीएसटीचा वाटा, स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे अजून मिळालेले नाहीत याकडे लक्ष वेधले होते. “राज्यातील स्थिती राजकारणाची नाही, पण काहीजणांना परिस्थितीचं गांभीर्य कळालेलं नाही. मी कुणाविषयी बोलतोय, हे जनतेला कळालं असेल” अशी टीका त्यांनी केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या या टीकेल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. “रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला ५२५ ट्रेन देण्यात आल्या आहेत, ज्यामधून ७ लाख ३० हजार श्रमिकांनी प्रवास केला आहे. जितक्या ट्रेन मागितल्या जात आहेत, त्यामध्ये स्वत: रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तसंच इतर शिवसेना नेत्यांनी केलेलं वक्तव्य पूर्ण राजकारण आहे. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वाईट आहे. देशातील ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्र सरकार पूर्पणपणे अपयशी ठरलं आहे. सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चुकीचं आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 5:34 pm

Web Title: mns leader sandeep deshpande slam state central govt dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धेतील व्यक्तीची सिंकदराबादेत करोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद
2 धक्कादायक : औरंगाबादमध्ये नऊ तासांत पाच करोनाबाधितांचा मृत्यू
3 “महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल”
Just Now!
X