Modi Assassination Plot : मोदींविरोधातला कटाच्या बातम्या ही भाजपाने सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेली चाल आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबल्याचे दिसून येते आहे. त्याचमुळे शरद पवारांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. अशात मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उत्तर दिले आहे. त्यामुळे ट्विटरवर या दोघांमध्ये वादच रंगल्याचे दिसून येते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान हे पक्षाचे नाही देशाचे असतात. पवारसाहेबांनी देशाचे राजकारण करावे द्वेषाचे नाही असा ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तर अशा प्रकारच्या गोष्टी समोर आणून तुम्ही जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात. एवढेच नाही तर अशा धमक्या आल्या असतील तर तुमच्या व्यवस्थेतील कायदा आणि सुव्यवस्थेचे हे अपयश आहे. राज्यामध्ये गुन्हेगारी वाढीला लागल्याचे अहवाल येत आहेत. महाराष्ट्र जनतेला असुरक्षित वाटू लागला आहे. त्यामुळे आधी लोकांची काळजी घ्या मुख्यमंत्री साहेब असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर मुख्यमंत्री आणि अजित पवार शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून भिडल्याचेच दिसून येते आहे.

Modi Assassination Plot : शरद पवार रविवारी नेमके काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचे पत्र मिळाल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या असून भाजपाचे हे नवे सहानुभूती कार्ड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केला आहे. रविवारी पुण्यात पक्षाच्या १९व्या वर्धापनदिनी आणि हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कथीत धमकीच्या पत्राच्या खरेपणावरही शंका असल्याचे पवार यावेळी म्हणाले. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्यावरील छाप्यादरम्यान हे धमकीचे पत्र सापडल्याचे दावा पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी भाजपावर टीका केली.