ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि वनराईचे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पहिला डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला. वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
वनराईचे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांनी आयुष्यभर देशाच्या हिताचाच विचार केला आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी रचनात्मक कार्य करणाऱ्यांना आधार दिला. गरिबांविषयी आस्था बाळगून आयुष्यभर ते कार्यरत राहिले.
देशाची अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या जीवनापासून भविष्यात इतरांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने वनराई फाऊंडेशनच्यावतीने या वर्षीपासून पुरस्कार सुरू करण्यात आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या लौकिक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार असून, या वर्षी वैज्ञानिक पद्ममविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची पुरस्कारासाठी समितीने निवड केली आहे. १ लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. माशेलकर हे वनराईच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. आयुष्यातील कमीत कमी १२ वर्षे अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजानिक दिव्याखाली अभ्यास करून इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी न्यूटनने स्वाक्षरी केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे डॉ. माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार समारंभ लवकरच नागपूरला आयोजित करण्यात येईल. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्रदीप मैत्र, बाळ कुळकर्णी, श्रीपाद अपराजित आणि सरिता कौशीक पुरस्कार समितीमध्ये असून त्यांनी या पुरस्कारासाठी डॉ. माशेलकर यांची निवड केली.