मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे हे चांगलेच संतापले आहेत. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठापुढे व्हावी असं सरकारला वाटत होतं तर दीड महिन्यापूर्वीच ही मागणी का केली नाही? दीड महिना वेळ वाया का घालवला असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे. यापुढे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भेटणार नाही असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणबाबतच्या सरकारच्या नियोजन शून्यतेवर संभाजीराजेंनी कडाडून टीका केली. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत संभाजीराजेंनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठी ठाकरे सरकार दोषी आहे. दीड महिन्यापूर्वी सरकारने कोर्टाला एक पत्र दिलं होतं. त्यामध्ये हा प्रश्न योग्य खंडपीठाकडे देण्याची राज्य सरकारने केली होती. तेव्हा घटनापीठाची मागणी केली नाही. आज मात्र चुकून हे प्रकरण खंडपीठाकडे आलं असून हे प्रकरण घटनापीठाकडे दिलं जावं असं राज्य सरकारने कोर्टाला सांगितलं. हे प्रकरण घटनापीठाकडेच दिलं जावं ही सगळ्यांचीच मागणी आहे पण दीड महिन्यापूर्वीच ही मागणी राज्य सरकारने का केली नाही? आज ही मागणी करुन राज्य सरकारने दीड महिना वाया घालवला असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा: वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारही काढेन- संभाजीराजे

सरकारकडे कोणतंही नियोजन नाही. मी गेल्या १५ दिवसांपासून जीव धोक्यात घालून फिरतो आहे. समाजातील तरुणांना संयमाचं आवाहन करतो आहे. पण इकडे सरकार कोणतंही नियोजन करताना दिसत नाही. सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत ना कोणतं धोरण आहे ना नीती. फ्लोअर मॅनेजमेंटही नाही आणि सगळा खेळखंडोबा सुरु आहे असाही आरोप संभाजीराजेंनी केला आहे.