पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातूनही राष्ट्रवादी काँग्रेसला हादरे बसू लागले आहेत. आमदार अवधूत तटकरे यांच्या आधीच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत दाखल होणार आहेत. जाधव शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा भास्कर जाधव यांनी आज (दि.९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केली. १३ सप्टेंबर रोजी जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती कोकणापर्यंत पोहोचली आहे. आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले जात असतानाच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी होणाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. भास्कर जाधव यांनीच शिवसेना प्रवेशाची घोषणा केली आहे. १३ सप्टेंबर रोजी भास्कर जाधव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

“माझं म्हणणं मी लिखित स्वरूपात शरद पवार साहेबांकडे दिले आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी राष्ट्रवादी सोडली आहे. ९ जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत आहेत. तसेच गुहागर पंचायत समिती आणि ७३ सरपंच माझ्यासोबत आहे”, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. भास्कर जाधव यांनी घड्याळ काढून शिवबंधन बांधल्याने राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसला आहे.

ऑगस्ट अखेरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत पक्षात मिळत असलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. “शरद पवार यांनी पुष्कळ दिले. पण, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त आहे. भारतीय जनता पक्षात मी जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू इच्छित नाही. शिवसेनेचा पर्याय खुला आहे”, असे सागंत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते.