विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता तर मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत भाष्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत आपली व्यूहरचना जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही दिलेली १४४ जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठीची दारं खुली ठेवली आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच आमची लढाई वंचितसोबत आहे, काँग्रेससोबत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्याला प्रकाश आंबेडकरांनी आज उत्तर दिले. “विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्री होईल. काँग्रेसला आम्ही १४४ जागांची ऑफर दिली आहे. त्यावर काही उत्तर येतं का ते पाहणार आणि मग आमची रणनीती जाहीर करणार. ८ सप्टेंबरा नागपूरच्या संविधान चौकातून रॅली निघेल. प्रत्येक दिवशी २ ते ३ जिल्ह्यात जाऊ आणि १८ तारखेला रॅलीचा समारोप कोल्हापुरात होईल ” असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे त्याचसाठी ही रॅली काढत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

“मी जोपर्यंत व्यूहरचना जाहीर करत नाही तोपर्यंत चर्चेचे दरवाजे खुले आहेत, आम्ही व्यूहरचना जाहीर केली की चर्चेची दारं बंद होतील” असंही त्यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटलं आहे. “एमआयएम आमच्यासोबत आहे, आता काँग्रेस काय निर्णय घेणार? ते अजून कळू शकलेलं नाही. जागावाटप केल्यास माघार घेणं कठीण असतं. काँग्रेसने त्यामधील एखादी जागा मागितली तर? त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहतो आहोत असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. ”

यावेळी त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपाच्याच सरकारमध्ये आपात्कालीन विभागाचे अध्यक्ष होते. फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची तयारीही राष्ट्रवादीने दर्शवली होती. त्यामुळे शरद पवार सेक्युलर आहेत याची खात्री आहे का? ” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर नरोवा कुंजरोवा वाल्यांशी आम्हाला युती करायची नाही असाही टोला त्यांनी लगावला.