आसाराम लोमटे

शाळेत केवळ चार भिंतीतले शिक्षण देण्याऐवजी या शिक्षणाला श्रमाची जोड देण्याचा अनोखा प्रयोग येथील ‘ज्ञानसाधना’ प्रतिष्ठानने केला आहे. ‘ज्ञानसाधना’च्या निवासी शाळेत भाजीपाला विकत घेतला जात नाही. चिमुकले हात आपल्या कष्टातून तो पिकवतात. हा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. दररोजच्या जेवणात मुलांना ताजी भाजी मिळते तीसुद्धा स्वत: पिकवलेली!

स्वतच्या जमिनीवर गेल्या पाच वर्षांपासून ‘ज्ञानसाधना’ प्रतिष्ठानने हा प्रयोग राबवला आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, मेथी, पालक, लसूण,  भेंडी, गवार, काकडी अशा विविध भाज्या पिकवल्या जातात. मातीत बियाणे रुजवण्यापासून ते भाजीपाला काढण्यापर्यंत सर्व कामे विद्यार्थीच करतात. ‘ज्ञानसाधना’च्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या बाराशे एवढी आहे. या विद्यार्थ्यांना दररोजच्या जेवणात भरपूर भाजीपाला लागतो. बऱ्याचदा ताजा भाजीपाला मिळत नाही तर कधी जी भाजी स्वस्त आहे तीच बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते . अनेकदा बाजारात जो भाजीपाला उपलब्ध आहे तोच घेऊन यावा लागतो. अशा सगळ्या अडचणी उद्भवल्यानंतर  ज्ञानसाधना’च्या किरण सोनटक्के यांना हा अनोखा उपक्रम सुचला. आपल्या निवासी संस्थेच्या जमिनीत भाजीपाला पिकवायचा आणि विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत श्रमदान करून त्याची मशागत करायची ही यामागची कल्पना होती. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आता अन्य निवासी शाळांसाठीही मार्गदर्शक ठरला आहे. येथून जवळच असलेल्या धर्मापुरी व मांडाखळी या दोन्ही ठिकाणी हा ‘ज्ञानसाधना हरितक्रांती प्रकल्प’ राबवला जातो.

या निवासी शाळेत शिकणारी बहुतांश मुले ग्रामीण भागातील आहेत. ती जेव्हा शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सुट्टीत गावाकडे जातात तेव्हा त्यांना उन्हाळ्यात केवळ काळेभोर शेत पाहावे लागते. प्रत्यक्षात पेरणी सुरू होते तेव्हा हे सर्व विद्यार्थी शाळेत परतलेले असतात. गावाशी आणि शेताशी नाळ असणाऱ्या मुलांना सुट्ट्यांमध्ये शेताचे खरे रंगरूप पाहायलाच मिळत नाही. हा प्रकल्प सुरू केला तेव्हा विद्यार्थ्यांनाही आनंद झाला. ते आपल्या गावाकडच्या शेतीतल्या भावविश्वात पुन्हा सहजपणे रमले. अशी माहितीही यावेळी ‘ज्ञानसाधना’च्या वतीने देण्यात आली. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमातून आता तब्बल एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना पुरेल एवढा भाजीपाला पिकवला जातो.

अलीकडे विषमुक्त अन्न मिळणे कठीण झाले आहे. भाजीपाल्यावर कीटकनाशकांचा मारा मोठय़ा प्रमाणात होत असल्याने हा भाजीपाला आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. अशावेळी ‘ज्ञानसाधना’च्या जमिनीवर पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याला कोणतीही फवारणी केली जात नाही. तो सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. यातून विद्यार्थ्यांना सकस अन्न मिळते. दररोजच्या दोन वेळच्या जेवणातील भाजीपाल्याबाबत ही निवासी शाळा आता स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाली आहे. चिमुकल्या हातांनी साधलेली ही किमया वैशिष्ट्यपूर्ण आहे.