करोना रुग्णसंपर्क शोधण्यात अडचणी; ‘टोसिलीझुमॅब’सारख्या औषधांचाही तुटवडा

निखिल मेस्त्री

पालघर ग्रामीणमध्ये प्रतिजन चाचण्या वाढविण्याचे प्रशासनाचे ध्येय असताना ऐन रुग्णवाढीच्या काळात पालघर ग्रामीण रुग्णालयातील प्रतिजन (अँटीजन) चाचणीचे साहित्य संपल्याचे उघड होत आहे. याचबरोबरीने टोसिलीझुमॅब लसींचाही तुटवडा जिल्ह्यात भासत आहे. ही बाब गंभीर असून करोना  चाचणीसाठीचे साहित्य संपल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वसई-विरार पाठोपाठ पालघर ग्रामीण भागात विशेषत: पालघर तालुक्यात पालघर नगर परिषद क्षेत्र, बोईसर लगतच्या ग्रामपंचायती परिसरात मोठय़ा प्रमाणात करोनाने शिरकाव केला आहे. एकमेकांच्या संपर्कातून करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व इतर संशयित लक्षणे आढळलेल्या रुग्णांची प्रतिजन चाचणी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये केली जाते. याचबरोबर घशांच्या नमुन्याद्वारेही करोना चाचणी केली जाते. ग्रामीण रुग्णालयाला दररोज सुमारे १०० पेक्षा जास्त तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण रुग्णालयातील प्रतिजन चाचणी साहित्याचा तुटवडा असल्याने अति लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांचीच प्रतिजन चाचणी केली जाते तर इतर रुग्णांचे घशाचे नमुने (आर टी पीसीआर चाचणी) या पद्धतीने घेतल्याने रुग्णांच्या अहवालाला उशीरही होत आहे. याउलट प्रतिजन चाचणीद्वारे रुग्णांचा अहवाल तातडीने येत असल्याने आरोग्य विभागाला पुढील कार्यवाही करणे सोपे जाते. मात्र त्या साहित्याचा तुटवडा भासत असल्याने रुग्णालय प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

ग्रामीण रुग्णालयासाठी पाच हजार प्रतिजन चाचणी साहित्य खरेदीचा प्रस्ताव असून पालघर नगर परिषदेतर्फे फिव्हर क्लिनिक सुरू होणार असल्याने नगर परिषद प्रशासनही प्रतिजन किट्स खरेदी करणार आहे असे समजते. लवकरच ते उपलब्ध करून घेतले जातील असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याचबरोबरीने सद्य:स्थितीत ग्रामीण रुग्णालयात अल्प प्रतिजन चाचणी किट्सच उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

नातेवाईकांची दमछाक

पालघर ग्रामीण भागात ३५ रुग्ण अतिदक्ष व दक्ष आहेत. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रक्तातील प्राणवायूची कमतरता किंवा फुप्फुसात विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास टॉसिलीझुमॅब या लसीचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र राज्यासह पालघर जिल्ह्यातही या लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय करोना उपचार केंद्रांमध्ये टॉसिलीझुमॅबची लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी तुटवडय़ामुळे ती उपलब्ध होत नाही. अशात तज्ज्ञामार्फत ही लस अतिदक्ष रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून दिल्यानंतर ती मिळविण्यासाठी नातेवाईकांना वणवण फिरून त्यांची दमछाक होत आहे. याचसोबत आर्थिक भरुदडही बसत आहे. या पार्श्वभूमीवर या लसीला पर्याय असलेल्या औषधांचा वापर करण्याची मागणीही यानिमित्ताने होत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीत असलेले किट्स ग्रामीण रुग्णालयाला तातडीने उपलब्ध करून घेण्याचा सूचना देते. ताबडतोब ते उपलब्ध होऊन तुटवडा भासणार नाही.

– डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक

अँटीजन किट्स उपलब्ध करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोललो असून त्या तातडीने उपलब्ध करून घ्याव्यात यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सांगितले आहे. ते लगेच उपलब्ध होतील याची खात्री आहे.

– राजेंद्र गावित, खासदार