माझी जीवाचे आवडी,पंढरपुरा नेईन गुढी..या अभंगाप्रमाणे बुधवारी बाजीराव विहिरीजवळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा रिंगण सोहळा पार पडला. माउली माउलीचा जयघोष आणि टाळमृदंगाच्या निनादात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात रिंगण पार पडले. संतांच्या पालख्या बुधवारी वाखरी येथे मुक्कामी तर गुरुवारी ( आज ) सर्व संतांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा पालखी सोहळा आता पंढरीच्या समीप आला आहे. बाजीराव विहिरीजवळ माउलींचे उभे आणि गोल रिंगण झाले. तत्पूर्वी माउलींची पालखी भंडीशेगाव येथून बुधवारी सकाळी मार्गस्थ होऊन बाजीराव विहिरीजवळ दुपारी आली. त्या नंतर इथे माउलीचे उभे रिंगण पार पडले. माउलीचा अश्वाने तीन फेऱ्या मारल्या. त्यानंतर बाजूला गोल रिंगणसाठी हजारो भाविक आले होते.

सकाळपासून या ठिकाणी वारकरी मोठ्या उत्साहात दिसून येत होते. फुगड्या,फेर धरून वारकरी देहभान विसरून गेला होता. दुपारी माउलींची पालखी पालखीतळावर आली. यावेळी माउलींच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्या नंतर माउलींच्या अश्वाने तीन गोल फेऱ्या मारल्या. या वेळी जमलेल्या हजारो भाविकांनी टाळ -मृदंगाचा निनाद आणि माउली माउलीचा जयघोष केला. या वेळी वातावरण भक्तिमय झाले होते. यानंतर वारकरी सांप्रदायात भेदाभेद अमंगल याप्रमाणे वारकरी एकमेकांचे पायी दर्शन घेत असलेले दिसून आले.

माउलींच्या अश्वाने गोल रिंगण पूर्ण केल्यावर तेथील माती कपाळी लावण्यासाठी भाविक पुढे आले. या वेळी माउली पालखी सोहळ्याचे सर्व मानकरी, फडकरी, महाराज मंडळीसह परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. जगद्गुरू तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बुधवारी वाखरी येथे मुक्कामी राहणार आहेत. आता केवळ ४ किलोमीटर दूर पंढरपूर आहे. त्यामुळे भाविकांना कधी एकदा सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतो याची ओढ लागली आहे.

आज पालखी पंढरीत येणार

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लाखो वारकरी मजल दरमजल करीत पंढरीच्या वारीला पायी येतात. ज्ञानेश्वर,तुकाराम, निवृत्तीनाथ,सोपानकाका यांच्या पालख्या आज ( गुरुवारी ) पंढरीकडे येणार आहे.

संत मुक्ताई या सर्व संतांना घेऊन जाण्यासाठी वाखरी येथे येते. त्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होतात. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.