हर्षद कशाळकर

निसर्ग वादळ येऊन दहा महिने लोटले तरी वादळात कोसळलेले विद्युत खांब शेतात पडून आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. महावितरणकडून या कोसळलेल्या खांबांची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी केली जात आहे.

३ जूनला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यााला बसला. अलिबाग, पनवेल, कर्जत, उरण, खालापूर, पेण, रोहा, मुरुड, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर व श्रीवर्धन तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला. या परिसरातील वीज वितरण यंत्रणा पूर्णपणे उद््ध्वस्त झाली. ३२ स्विचिंग उपकेंद्र, २६१ फीडर, १९७६ गाव, ६७७३ वितरण रोहित्र, ७०१५ उच्चदाब खांब, १४,८६५ लघुदाब खांब वादळाच्या तडाख्यात सापडले. या नुकसानामुळे १० लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र या वादळामध्ये शेतांमध्ये पडलेले विद्युत खांब काही ठिकाणी अजून तसेच पडलेले असल्याने येत्या पावसाळ्यातील शेती कशा प्रकारे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही निसर्ग चक्रीवादळात पडलेले विद्युत खांब तसेच असल्याने मान्सूनपूर्व शेतीची कामे रखडली आहेत.

चैत्र संपल्यानंतर दक्षिण रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी तरवे भाजणे, नांगरणी करणे, शेतीची स्वच्छता करणे अशी कामे शेतकरी करत असतात मात्र शेतांमध्ये पडलेल्या विद्युत खांब, तारा इत्यादींमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून भाजणी नांगरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. येत्या काही दिवसांत शेतातील विद्युत खांब बाजूला केले गेले नाही तर या वर्षी शेती करणे अवघड जाणार असून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. महावितरणने त्वरित या समस्येची दखल घेऊन शेतातील विद्युत खांब काढावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मात्र महावितरण कंपनीने अद्याप शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

शेतामध्ये विद्युत खांब पडलेले असल्याने या पावसाळ्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. येत्या काही दिवसांत हे खांब उचलले नाहीत तर या वर्षी शेतीची मशागत करता येणार नाही. यामुळे नुकसान होणार आहे. महावितरण कंपनीने त्वरित हे खांब उचलून मदत करावी.

– नर्मदा कांबळे, शेतकरी

निसर्ग चक्रीवादळात पडलेले खांब अद्यापही हटविले नाहीत. हजारो शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शेतात नांगर किंवा ट्रॅक्टर चालवण्यात अडचणी येत आहेत. महावितरणने सर्व पोल हटवू असे मागील वर्षी मान्य केले होते. पेरणीपूर्व कामांना जोरात सुरुवात झाली तरी याकडे कोणाचेच लक्ष नाही. पडलेले खांब, तारा, अँगल यांमुळे मोठ्या प्रमाणात जमिनीत पिके घेता येत नाहीत.

– काशिनाथ गाणेकर, शेतकरी