सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर गेल्या ५ मे रोजी महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांनी अवमानित झाल्यानंतर विनंती बदली मागून रजेवर गेल्यामुळे पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बाजूने समस्त जनता रस्त्यावर उतरल्याचा फटका काँग्रेसला बसल्याच्या पार्श्र्वभूमीवर बुधवारी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा पाणी प्रश्नावर पालिका आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. मुबलक पाणीसाठा असूनदेखील तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. काही भागात तर पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याबद्दल नाराजीचे बोल सुनावत आमदार शिंदे यांनी, चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीदर आकारणी संपूर्ण वर्षाची कशी घेता, असा सवाल उपस्थित करीत, पाणीदरात ५० टक्के कपात करण्याची आग्रही मागणी केली.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वजनदार नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारूण पराभव झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जनतेच्या सेवेसाठी पुन:श्च ‘हरिओम’ करीत सोलापूरकरांचा पाणी प्रश्न हाती घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सेतू कार्यालयातून नागरिकांना विविध आवश्यक दाखले वेळेवर मिळत नाहीत म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रशासन कामचुकारपणा करते आणि त्याचा फटका मात्र आम्हाला बसतो, निवडणुकीत पराभव झाला तरी थांबणार नाही. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारी महापालिकेत येऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन पाण्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या समवेत महापौर अलका राठोड होत्या. शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा असूनदेखील केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. काही भागात तर चक्क पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मागील दोन वर्षांच्या दुष्काळी संकटाच्यावेळी देखील अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. एकीकडे तीन ते पाच दिवसाआड पाणी देता आणि दुसरीकडे नागरिकांकडून पाणीपट्टी मात्र संपूर्ण वर्षांची आकारता, याबद्दल तीव्र आक्षेप घेत, आमदार शिंदे यांनी प्राप्त परिस्थितीत पाणीदरात ५० टक्के कपात करण्याची मागणी आयुक्त गुडेवार यांच्याकडे केली. विडी कामगार महिला व त्यांच्या शाळकरी मुलांना मोफत बस प्रवास पास द्यावेत, एलबीटी वसुली चांगल्याप्रकारे होऊनदेखील रस्त्यांची कामे थांबली आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डेही बुजविले जात नाहीत. कचरा वेळेवर उचलला जात नाही, आदी मागण्यांकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.
पोलीस मुख्यालयाजवळील भगवानगर झोपडपट्टीत शासनाच्या आवास योजनेखाली पक्की घरे बांधण्याची योजना हाती घेऊन काही घरे बांधून पूर्ण झाली आहेत. परंतु पूर्ण झालेली घरे लाभार्थ्यांना का देत नाहीत, असाही सवाल आमदार शिंदे यांनी केला. त्यांचे राजकीय विरोधक माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी याच प्रश्नावर गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्तांची भेट घेऊन बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एकाचवेळी सर्व घरांचे वाटप करण्याची मागणी केली होती. परंतु याउलट, आमदर प्रणिती शिंदे यांनी, जस जशी घरे बांधून तयार होतील, तस तसे त्यांचे वाटप लाभार्थ्यांना करावे. सध्या ५० घरे बांधून तयार आहेत. त्यांचे वाटप का करीत नाही, अशी विचारणा केली. दिशाभूल करणा-यांचे ऐकून विकास थांबवू नका, असेही बोल त्यांनी आयुक्तांना सुनावले. मात्र यासंदर्भात आयुक्त गुडेवार यांनी, २३ लाभार्थ्यांची नावे दुबार असल्याचे पाहणीत आढळून आल्यामुळे पूर्ण झालेली घरे वितरित केली नाहीत. नागरी सुविधा उपलब्ध झाल्या तर अशी घरे लाभार्थ्यांना वाटप करू, असे स्पष्टीकरण दिले.