महावितरण व विद्युत मंडळ यांच्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन ड्रोन तंत्रज्ञानावर आधारीत ‘ड्रोन व इमेंज प्रोसेसिंगच्या सहायाने विद्युत वाहिन्यांमधील कमकुवतपणा व दोष शोधणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान निर्माण केले आहे. इचलकरंजी येथील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या स्मिता सुतार, सना पटेकरी व अनुराधा दुधाणे या विद्यार्थ्यांनीनी हा प्रकल्प दोन विभागात बनवला असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.

विजेच्या खांबावर दोन प्रकारच्या विद्युत वाहिन्या असतात. हवेतील व नैसर्गिक घटकांमुळे या वाहिन्यांमधील ताण कमी होऊन तारांचा पीळ तुटणे, वाहिन्या गंजणे व त्यावर काजळी जमणे असे काही दोष निर्माण होऊन शेती, जीवित व वित्त हानी होते. सध्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणासाठी पायी चालत जावून खालूनच खांबावरील वाहिन्यांची पाहणीची पारंपारिक पध्दत अवलंबली जाते. यामुळे वाहिन्यांमधील दोष समजणे कठीण होते. तसेच, दूर दूर पर्यंत असलेल्या खांबांमुळे पायपीटही करावी लागते.

या प्रकल्पामध्ये ड्रोन व त्याला जोडलेल्या कॅमेराचा योग्य उपयोग करुन घेतला आहे. उंच खांबावर असलेल्या विद्युत वाहिन्या, इन्सुलेटर, डॅम्पर, जंपर यांचे सुस्पष्ट छायाचित्रे संगणकावर तारविरहित (वायरलेस) प्रणालीद्वारे पाठवले जाते. सर्वे करणाऱ्या व्यक्ती एका जागी बसून छायाचित्रांची प्रतिमा ‘अल्गोरीदम’ प्रणालीमध्ये पडताळून पाहते. त्याद्वारे वाहिन्यांमधील दोष अचूक समजले जाऊन, देखभाल दुरुस्तीचे काम निर्धोकपणे पूर्ण केले जाते. यामुळे मनुष्यबळ व वेळेची बचतही होऊन संभाव्य धोकाही कळून येतो.

दुसऱ्या विभागामध्ये विद्यार्थ्यांनी एक उपकरण तयार केले आहे. त्यामध्ये ‘कॉम्प्युटर व्हीजन’ व ‘इमेज प्रोसेसिंग अल्गोरीदम’चा वापर केला असून, विद्युत वाहिन्यांमधील तारांची पीळ व कोन (व्टीस्ट अॅ गल ), व्यास व गंज याची अचुक माहीती मिळते. विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प टेक्सास इंन्स्ट्रूमेंटस, बेंगलोर येथे सादर केला असून जागतिक दर्जाच्या नियतकालिकेमध्ये लेख सुध्दा प्रसिध्द केला आहे. या प्रकल्पास ईटीसी विभागातील प्रा.व्ही. बी. सुतार व महापारेषणचे अभियंता एस.एस. साने यांचे मार्गदर्शन लाभले.