श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
– बालकवींच्या या परिचित काव्यपंक्ती दरवर्षी श्रावणात हमखास आळवल्या जातात. यंदाही श्रावणात पहिल्या दिवसापासूनच पावसाने रिमझिम स्वरूपात हजेरी लावल्यामुळे चोहीकडे हिरवळ दाटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पावसाळ्यातही सारखे ऊन पाहण्याची सवय झालेल्या मराठवाडय़ातील मंडळींना या पावसाचेही मोठे अप्रूप वाटत आहे. राज्याच्या इतर भागात दमदार पाऊस पडत असताना मराठवाडय़ाची मात्र पावसाळ्यातही पुरेशा पावसाअभावी पिण्याच्या पाण्यावाचून परवड होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह शहरातही कमी-अधिक फरकाने ही समस्या सारखीच आहे.
यंदा श्रावणातील पहिल्या दिवसापासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे सुकलेले चेहरे पुन्हा हसरे होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. त्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळते आहे. मात्र, उस्मानाबाद, हिंगोली, जालना वगैरे जिल्ह्य़ांत आजही पावसाचा रुसवा कायम राहिल्याचे वृत्त आहे.
खरीप हंगामात आतापर्यंत ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. औसा तालुक्यातील उजनी, मातोळा, देवताळा आदी सात गावांना पावसाचा फटका बसला. त्यामुळे अजून पेरणीस प्रारंभ झाला नाही. सोयाबीनच्या पेऱ्यात ठिकठिकाणी महिनाभराचे अंतर आहे. त्यामुळे कुठे दुंडणी, खुरपणी, कुठे फवारणी सुरू आहे, तर कुठले पीक जमिनीतून आता वर येते आहे. पिकाच्या प्रत्येक अवस्थेत पावसाची गरज असते. गेले १५ दिवस पाऊस गायब झाल्यामुळे हातचे पीक जाईल, अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. या पाश्र्वभूमीवर रविवारी सायंकाळपासून श्रावणातील पहिल्या दिवसालाच पावसाने उत्साहात प्रारंभ केला. अर्थात, हा पाऊस समाधानकारक नसला, तरी शेतकऱ्यांच्या मनात आशादायक चित्र निर्माण करणारा नक्कीच आहे.
सोमवारी सकाळी आठपर्यंत जिल्हय़ात सरासरी ६.२६ मिमी पाऊस झाला. आतापर्यंतच्या पावसाची आकडेवारी १६७.७२ मिमीवर पोहोचली आहे. जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये, कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे – लातूर ५.३७ (१६५.३७), औसा ३.४२ (१३९.९१), रेणापूर ५.२५ (१५७.७५), उदगीर ३.५७ (१२९.०१), अहमदपूर ४.८३ (१४३.७), चाकूर ४.२० (१९०.६), जळकोट १९ (११३.५), निलंगा ५.६२ (१७७.०७), देवणी ६ (२२७.९५), शिरूर अनंतपाळ ५.३३ (२३१.८९).
परभणीत श्रावणसरी बरसल्या
यंदा सुरुवातीपासूनच दगा देणारा पाऊस अजूनही जोरदार कोसळत नाही. पावसाअभावी शेती व्यवसाय अडचणीत आला असून श्रावणातही बहुतांश जमिनी पिकांअभावी काळ्याभोर दिसत आहेत. पावसाचा रिमझिमवरच भर असल्याने अजूनही अनेक भागात पेरणी झाली नाही. दरम्यान, सोमवापर्यंत जिल्हाभरात १०७.५३ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी दुपारनंतर गंगाखेड, पाथरी, सोनपेठ या ३ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.
पावसाने यंदा चांगलीच हुलकावणी दिली. जून, जुलतील सर्वच नक्षत्रे कोरडी गेली. जुलच्या तिसऱ्या आठवडय़ात झालेल्या रिमझिम पावसावरच अनेकांनी पेरणी केली. परंतु अजूनही काही भागात पेरणी रखडली आहे. सेलू, पाथरी, मानवत भागात जुलमध्ये झालेल्या पावसावर पेरणी करण्यात आली. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा या भागात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे झालेली पेरणी धोक्यात आली होती. अजूनही परभणी तालुका संपूर्ण कोरडाठाक असून परभणीसह जिंतूर तालुक्यातील शेती अजूनही काळीच राहिली आहे. रविवारी जिल्हाभरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस जिल्हय़ाच्या सर्वच भागात असला, तरी या पावसात जोर मात्र नव्हता. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस १३१ मिमी सोनपेठ तालुक्यात झाला. परभणी ११०.३५, गंगाखेड १००.२५, मानवत १०३.९६, जिंतूर १०७.१६, पाथरी ११३, सेलू १२१.८, पूर्णा ९१.४४ या प्रमाणे तालुकानिहाय पाऊस असून, सर्वात कमी नोंद (८९ मिमी) पालम तालुक्यात झाली.
जिल्हय़ात आतापर्यंत केवळ १०७.५३ मिमी पावसाची नोंद झाली. यात रविवारच्या ६.९८ मिमी पावसाचा समावेश आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाथरी, गंगाखेड व सोनपेठ तालुक्यांत दुपारी ४ वाजता तासभर पाऊस झाला. जिल्हय़ाच्या इतर भागात केवळ पावसाची भुरभुर सुरू होती. दरवर्षी श्रावण महिन्यात पिके वाऱ्याला लागलेली असतात. यंदा मात्र सारे चित्र उलटे आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2014 रोजी प्रकाशित
हर्षोत्फुल श्रावणसरी…
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

First published on: 29-07-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in shravan