News Flash

संपासाठी तरुण शेतकऱ्यांचा पुढाकार

मुंबईचा दूध-भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पारंपरिक आंदोलनाऐवजी वेगळी वाट ; मुंबईचा दूध-भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ जूनपासून शेतकऱ्यांचा संप सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर त्याची प्रतिक्रिया उमटू लागली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना हाताशी धरून हा संप फोडण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी वर्ग आणखी चवताळून उठला आहे. कोणत्याही परिस्थितीत संप करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट झालेली नसली तरी मुंबईत येणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा रोखण्याचा आंदोलकांचा प्रयत्न राहणार आहे. या आंदोलनासाठी तरूण शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत शेतीतील गुंतवणूक वाढली असून शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना स्वामिनाथन आयोग लागू करू, कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव अशा अनेक घोषणा केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची तरुण पिढी भाजपकडे आकर्षति झाली. सत्तांतर झाल्यानंतर दुधाला ३० रुपये दर मिळेल, उसाला चार हजार रुपये, कांद्याला वाढीव दर मिळेल, शेतकरी सुखी होईल, असा भ्रम निर्माण झाला. पण राजकीय घोषणा वेगळ्या अन् अर्थकारण वेगळे असल्याने भाजप नेत्यांच्या घोषणा हवेत विरल्या.

शेतीत आता पदवीधर मुले मोठय़ा प्रमाणात आली आहेत. त्यांना आपले भवितव्य शेतीतच घडवायचे आहे. समाजमाध्यमाचे दुधारी शत्र त्यांच्या हातात आहे. पूर्वी आजोबा, वडील कुठल्यातरी नेत्यांचे कार्यकत्रे किंवा समर्थक होते. पण काही ठरावीक घराण्यांचा विकास झाला. त्यामुळे हे तरुण जिंदाबाद, मुर्दाबाद करण्याऐवजी प्रश्नांची चर्चा करु लागले. पुणतांबा येथेही तेच झाले.

डॉक्टरांना मारहाण झाली म्हणून दोन महिन्यांपूर्वी त्यांनी संप केला. मग शेतकऱ्यांनी संप केला तर काय होईल, अशी कल्पना राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या डोणगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील धनंजय धोर्डे या पदवीधर तरुणाच्या डोक्यात आली. शेजारी पुणतांबे (ता. राहाता, जि. नगर) हे मोठे गाव असल्याने सर्वच कार्यकर्त्यांना ते व अभय चव्हाण भेटले. काँग्रेसचे डॉ. धनंजय धनवटे, भाजपचे धनंजय जाधव, सर्जेराव जाधव, राष्ट्रवादीचे मुरलीधर थोरात, शिवसेनेचे सुहास वहाडणे तसेच बाळासाहेब चव्हाण, सुधाकर जाधव, सरपंच छाया जोगदंड, उपसरपंच प्रशांत वाघ आदींनी ही कल्पना उचलून धरली. २३ मार्च रोजी ग्रामसभा घेऊन १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे ठराव करून तहसीलदारांकडे देण्यात आले.

शेतकरी संपावर जाणार असल्याचे ऐकून अनेकांना कुतूहल व उत्सुकता वाटली. गावोगाव ठराव करण्यात आले. नाशिकचे डाळिंब व द्राक्ष उत्पादक भाव पडल्याने मेटाकुटीला आले होते. त्यांनी संपात सामील होण्याची घोषणा केली. औरंगाबाद, बीड, नगर व नाशिकमधील सुमारे २२०० गावांनी ग्रामसभा घेऊन संपावर जाण्याचा निर्णय घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत शून्य प्रहारात संपावर चर्चा केली. अधिवेशनातून त्यांनी थेट पुणतांबा गाठून संपाला पािठबा दिला. गावोगाव सभांना प्रतिसाद मिळत असल्याने तसेच समाजमाध्यमावर संपाचा रेटा वाढल्याने नंतर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट, रघुनाथदादा पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अजित नवले यांच्यासह ३२ संघटनांनी पािठबा दिला.

संपाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळणार याची कल्पना आल्यानेच सरकारच्या वतीने संप फोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणतांबे येथील गावकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने काही कार्यकत्रे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेले. चर्चा सकारात्मक झाली. पण मुख्यमंत्री व विखे संप फोडायला निघाल्याचा पक्का समज शेतकऱ्यांचा झाला. त्यामुळे विखे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर तरुण आणखीच चवताळले. शेतकऱ्यांना संप मागे घ्यायला लावून संघर्षयात्रेत दुसऱ्याच दिवशी विखे जातात, ही भूमिका कुठली असा सवाल विचारण्यात आला.

आंदोलन दडपले न जाण्याचा विश्वास

सुरुवातीला पेरणी करायची नाही, अशी भूमिका होती. पण आता मुंबईला जाणारा भाजीपाला, दूध रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी रस्त्यावर गाडय़ा अडवत, पण या वेळी शेतकऱ्यांना घरी जाऊन विनंती केली जाणार आहे. पूर्वी सहकारातील दिग्गज नेत्यांचे दूध संघ होते. ते आता मोडीत निघाले. आता खासगी उद्योजकांचे प्रकल्प आहेत. त्यांच्या नाडय़ा स्थानिक पातळीवरील शेतकरी मुलांच्या दूध डेअऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे पूर्वीसारखे आंदोलन नेते दडपणार नाही, असा संयोजकांना विश्वास आहे.

शेतकरी संघटनेचे नेते दिवंगत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली ३० वर्षांपासून शेतकरी चळवळ सुरू झाली. आता सत्ताधारी व विरोधक उघडे पडले. संघर्षयात्रा काढणारे फसवितात हे शेतकऱ्यांना कळले आहे. संप फोडण्याचा प्रयत्न झाल्याने ते चवताळून उठले. तिन्ही शेतकरी संघटनांना पाठिंबा द्यावा लागला. आम्ही प्रत्यक्षात आंदोलनात उतरणार आहोत. संपाने राजकीय अस्थिरता येईल. निर्यातबंदी व आयातीला सवलत यामुळे भाव पडले. सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. – रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

शेतकरी संप केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावा. दुर्लक्ष करू नये. जो मरायला तयार होतो तो उपाशी राहण्यास तयार होईल. पण त्याने संप केला तर तो जगाला उपाशी ठेवील. ही त्याची नांदी आहे. वेळीच लक्ष घातले नाही तर अस्वस्थतेतून अराजकता माजेल.   खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:06 am

Web Title: raju shetti farmers strike marathi articles
Next Stories
1 १८ वैद्यकीय अधिकारी अनधिकृतपणे गैरहजर
2 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे दुरुस्तीविना पुनर्मुद्रण
3 मृतदेहाची चोरी
Just Now!
X