राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच आता पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य (एमईपी) काढून टाकल्यास कांद्याच्या निर्यातीला चालना मिळेल आणि कांदा उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल या उद्देशाने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांना विनंती केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिली.
या वर्षी चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले असून, खरीप कांदाही उशिराने परंतु मोठय़ा प्रमाणावर बाजारात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव खूप घसरले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले,यंदा चांगला पाऊस झाल्याने कांद्याचे क्षेत्र वाढून मागील वर्षीच्या तुलनेत चांगले उत्पादन झाले. खरीप कांदा नाशवंत असल्याने त्याचा साठा करून ठेवता येत नाही. थोडासा उशिरानेच हा कांदा बाजारात आल्याने कांद्याचे दर मोठय़ा प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याचे किमान निर्यातमूल्यदेखील जास्त असल्याने कांदा शेतकरी त्याची निर्यात करू शकत नाहीत. सध्या कांद्याचे किमान निर्यातमूल्य एमईपी १,१५० डॉलर प्रतिटन आहे. हे किमान निर्यातमूल्य काढून टाकल्यास कांद्याची निर्यात मोठय़ा प्रमाणावर होईल उत्पादकांना चांगला दर मिळेल.