24 January 2021

News Flash

सिटी बँकेतील निवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित; मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

ज्येष्ठ नागरिकांना पाठपुराव्यात येत आहेत अनेक अडचणी

संग्रहित छायाचित्र

सिटी बँकेमध्ये अनेक वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या ७२ चे ८९ वय असलेल्या वृद्ध कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शन मिळत नसून आपला हक्क मिळवण्यासाठी त्याला अनेक ठिकाणी पाठपुरावा करावा लागत आहे. पेन्शनच्या रकमेतून या मंडळींना जगण्यासाठी तसेच औषधोपचाराकरीता आधार होईल, या आशेपोटी ही मंडळी बँक प्रशासनाकडे अनेक प्रकारे पाठपुरावा करीत आहेत.

सिटी बँकेतील सुमारे शंभर कर्मचाऱ्यांनी १९९३ साली स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. कर्मचाऱ्यांचे बँकेसोबत १९८३ मध्ये झालेल्या करारानुसार स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे बँक व्यवस्थापनाने मान्य केले होते. बँकेने या मंडळींना दोन प्रकारे पेन्शन देण्याचे मान्य केले. मात्र, कालांतराने विशेष पेन्शनची रक्कम देण्याचे सुरू ठेवून उर्वरित रक्कम एलआयसी तर्फे देण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते. मात्र, काहींना निवृत्ती वेतन सुरू झाले असले तरी काही कर्मचारी त्यापासून आजपर्यंत वंचित राहिले आहेत.

दरम्यानच्या काळात पेन्शनच्या रकमेमध्ये कालांतराने वाढ होत गेली असताना एकाच वर्षी कामावर रुजू झालेली, एकाच पगाराने स्वेच्छानिवृत्ती घेतलेले तसेच नोकरीत एकाच पदावर काम करणाऱ्या, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर बँकेने काही लोकांचे निवृत्ती वेतन बंद केले. बँकेकडून या निवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या पत्र व्यवहाराचा प्रतिसाद मिळत नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करून श्रम विभाग तसेच सेंट्रल ट्रिब्युनल इत्यादी ठिकाणी दाद मागितली.

आणखी वाचा- ‘होय, ठाकरे सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं’; राजू पाटील यांना वाचकांचा ‘मनसे’ पाठिंबा

दरम्यान, काही खटले प्रलंबित असले तरी सुद्धा मुंबई व उपनगरात राहणाऱ्या अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. सध्याच्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तसेच अधिकतर निवृत्त कर्मचारी ७५ वर्षाहून अधिक वयस्कर झाल्याने त्यांना न्यायालयीन लढा देणे किंवा या कामी पाठपुरावा करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लक्ष घालून या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतन मिळवून द्यावे, अशी मागणी केळवे येथील अजित पेजावर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी काही तोडगा ताडीने न निघाल्यास वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना नाईलाजाने आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सिटी बँकेचे मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष प्रवीण कुमार सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात भाष्य करण्याचे टाळले. तसेच बँकेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 3:26 pm

Web Title: retired employees of citibank deprived of pension they requested to the cm for to intervention aau 85
Next Stories
1 अहमदनगर: ८५ वर्षांच्या आजीबाई करोनाला हरवून घरी परतल्या
2 रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू
3 ‘ताज’ला भाडेपट्ट्याने जमीन, सिंधुदुर्गात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा
Just Now!
X