रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी गेलेला अभिनेता रितेश देशमुख तेथून परतताना रोप- वेमध्ये अर्ध्या तासासाठी अडकून पडला होता. त्याच्यासोबत दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील आणि अनंत देशमुखही होते. रोप- वेच्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने तिघेही अडकून पडले होते. जवळपास अर्ध्या तासानंतर हा तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर रोप- वे सुरू झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रितेश आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या चित्रपटाची टीम गुरुवारी रायगड किल्ल्यावर गेली होती. पाचाड येथील अनंत देशमुख यांनी त्यांना गडदर्शन घडवले. संध्याकाळी रोप- वेने खाली येत असताना त्यात अचानक बिघाड झाला. उंचावर असलेली ट्रॉली मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हेलकावे खात होती. त्यामुळे सर्वांचीच पाचावर धारण बसली होती. अखेर अर्ध्या तासानंतर हा बिघाड दूर केल्यानंतर सर्व जण सुखरूप खाली पोहोचले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 1:09 pm