सांगली : सांगली महापालिका निवडणूक ही केवळ महापालिकेच्या सत्तेसाठी नसून, यामागे विधानसभा निवडणुकीची बिजे रोवली जात आहेत. उमेदवारी वाटप करीत असताना किंवा कार्यकर्त्यांना ताकद देत असताना भविष्यात आपल्याला कोण उपयुक्त ठरेल, यावरच राजकीय गणिते मांडण्यात आली आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी विधानसभेवेळी ही कुमक कोणाच्या पारडय़ात टाकायची याची गणिते घालत आपसातील जागावाटप करण्यात आले आहे. तर सांगली व मिरज येथील विधानसभेच्या दोन्ही जागा या भाजपकडेच असल्याने आगामी काळात विरोधक वरचढ ठरणार नाहीत अशी ताकद उमेदवारांना दिली जाणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या महापालिकेत केवळ परिवर्तन हवे अशी वरकरणी भाजपची भूमिका असली तरी यात आगामी विधानसभा-लोकसभेसाठी पडद्याआडून मिळणारी रसद खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

सांगली महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता उमेदवार निश्चितीनंतर सुरू झाली असून सत्तेचा प्रथमच दावा करणारी भाजप एकीकडे असली तरी सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी रिंगणात उतरले असून यावेळी ही निवडणूक बहुरंगी, बहुढंगी असल्याचे प्राथमिक पातळीवर दिसत आहे. मोठ्या संख्येने अपक्ष रिंगणात उतरल्याने पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यात अपयश आले हे स्पष्ट झाले. सांगली महापालिकेच्या सत्तेच्या राजकारणात आजपर्यंत महत्वाची पदे पटकावण्यात यशस्वी ठरलेल्या मिरज पॅटर्नला यंदा मात्र ब्रेक लागल्याने संदर्भ बदलण्याचे संकेत आहेत.

मिरज आणि सांगलीमध्ये भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान झाले, यामागे काँग्रेसअंतर्गत गटबाजी जशी कारणीभूत ठरली तशीच पर्याय शोधण्यात काँग्रेसला आलेले अपशयही आहे. १५ वर्षे दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्याने या दोन्ही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आहेत. यामुळे या निवडणुकीत झाले तर नुकसान काँग्रेसचेच होते मग आम्ही कशाला काळजी घ्या ही भूमिका  राष्ट्रवादीची राहिली. यातूनच भाजपला हस्ते, परहस्ते कार्यकर्त्यांची फळी आंदण दिली. आज हा दानशूरपणाच राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला मारक ठरला. आता मात्र दोन्ही काँग्रेसची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.

काँग्रेसमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपमध्ये जसे विद्यमान म्हणून सांगलीतून सुधीर गाडगीळ, मिरजेतून सुरेश खाडे यांच्या नावाला सध्या तरी पर्याय नाही तसे काँग्रेसमध्ये मात्र एकापेक्षा एक इच्छुक आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे जसे इच्छुक आहेत तसेच राजकीय वारसदार म्हणून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा काँग्रेसच्या उमेदवारीवर हक्क सांगितला जाणार आहे, तर रक्ताचा वारसदार म्हणून वसंतदादांचे नातू म्हणून विशाल पाटील यांची मोच्रेबांधणी सुरू आहे. जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी मिळते-जुळते घेतले असले तरी ही त्यांची राजकीय गरज आहे. मात्र, विशाल पाटील यांनी आपली वेगळी ओळख कायम ठेवण्यातच सध्या तरी स्वारस्य दाखविले आहे.

विधानसभेसाठी अद्याप वर्षभराचा अवधी असला तरी शिवसेनाही पश्चिम महाराष्ट्रात आपले राजकीय पाय रोवण्याच्या इराद्याने या निवडणुकीच्या मदानात उतरली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक गांभीर्याने घेतली असली तरी या पक्षांचीही आयातीवर सारी भिस्त दिसत आहे. अगदी पृथ्वीराज पवारांपासून शेखर माने, दिगंबर जाधव यांच्यापर्यंतचे कार्यकत्रे या रेसमध्ये आहेत. पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी तर स्पष्टपणे ही निवडणूक लोकसभा, विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच बघितली जात असल्याचे सांगितले आहे.

भारतीय जनता पक्षाला महापालिकेपेक्षा लोकसभा आणि विधानसभा महत्वाची असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीप्रमाणे चमत्कार करण्याबरोबरच मतदारापर्यंत पक्षाचे कमळ कायम ठेवण्यातच जादा रस आहे. सांगली-मिरजच्या आमदारांना आपली जागा कायम ठेवण्यासाठी बाहेरून मिळणारी मदत खंडित होणार नाही याची दक्षता घेतच मोच्रेबांधणी करावी लागणार आहे. यासाठी विधानसभेला मदत करणारे दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेतच प्रचाराची राळ उडवली जाणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून सत्तेच्या राजकारणात मिरज पॅटर्न हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे. यामागे सत्तेचे जसे राजकारण आहे तसेच आर्थिक हितसंबंधाचेही आहे. मिरजेत एकमेकांचा राजकीय विरोध कायम ठेवत एकमेकांना कधी हुलकावणी देत कधी आपल्या पोळीवर तूप पडेपर्यंत विरोधकांची भूमिका घेत राजकारण करण्याची पध्दत आहे. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेशही खुंटीला टांगण्याची सवय लागली आहे. यंदा मात्र परिस्थितीच अशी निर्माण झाली की एकमेकांविरूध्द मदानात उतरल्याशिवाय अस्तित्वच राहणार नाही अशी वेळ आली आहे.

मिरज पॅटर्नमधील माजी महापौर इद्रिस नायकवडी आणि मनुद्दीन बागवान राष्ट्रवादीच्या झेंडय़ाखाली एकत्र आले आहेत, तर या खेळीत काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार एकाकी पडले असून सुरेश आवटी हे भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले आहेत. नायकवडी हे पुत्र अतहर  आणि जामदार पुत्र करन यांच्यासह मदानात उतरले आहेत. तर आवटी स्वत मदानात न उतरता दोन पुत्र संदिप आणि निरंजन यांच्यासाठी रिंगणात आहेत. नायकवडी आणि जामदार यांचा प्रभाग ५ मधील सामना लक्षवेधी ठरणार असून याचे पडसाद प्रभाग ६ आणि ७ मध्ये दिसणार आहेत. दोघांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आतापर्यंतच्या मिरज पॅटर्नच्या मूळावर उठली असल्याने भविष्यात महापालिकेची सत्तासूत्रे कोणाच्या हाती जाणार हे या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

मिरजेसह सांगलीवाडी येथील सामनाही रंगतदार बनला आहे. भाजपकडून माजी आमदार दिनकर पाटील यांचे निकटवर्तिय अजिंक्य पाटील, काँग्रेसचे दिलीप पाटील आणि राष्ट्रवादीचे हरिदास पाटील यांच्यात होत असलेली लढतही एकमेकांच्या राजकीय अस्तित्वाचीच आहे. मिरजेतील जामदार-नायकवडी आणि सांगलीवाडीच्या पाटलांच्या वाडय़ातील भाउबंदकी आघाडीच्या राजकारणाला खीळ घालणारी ठरली. या ठिकाणी आघाडी मोडीत काढीत मत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव नेत्यांनाही मान्य करावा लागला. या मत्रीपूर्ण लढतीचा अन्य प्रभागावर परिणाम होणार की नाही हे अंतिम टप्प्यात लक्षात येणार आहे.