24 November 2020

News Flash

“शाळा सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, याउलट…”

शाळा-कॉलेज सुरू करण्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांची महत्त्वाची पोस्ट

रोहित पवार. (संग्रहित छायाचित्र)

मागील काही दिवसांपासून राज्यात करोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून काही स्थानिक प्रशासनांनी आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून नववी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेज सुरू केली जात आहेत. प्रत्येक विभागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाचा आहे. अशा परिस्थितीत जिथे शाळा सुरू होत आहेत, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असताना मुंबई, ठाण्यात मात्र ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यानंतर रोहित पवार यांनी संभ्रमात असलेल्या पालकांसाठी ट्विट केलं आहे. “शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन तिथल्या करोनाच्या परिस्थितीनुसार घेईल. जिथं शाळा सुरू होतील, तिथं सुरक्षेची संपूर्ण काळजी घ्यावी. आणि जिथं शाळा सुरू होणार नाहीत, तिथल्या मुलांनी काळजी करु नये. तिथेही योग्य वेळी शाळा सुरू होतील, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तणावमुक्त रहावं”, असा दिलासा देणारं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

 

याशिवाय, रोहित पवार यांनी फेसबुकवरही विद्यार्थ्यांसाठी एक छानसा संदेश दिला आहे. “जवळपास आठ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात परवा इयत्ता ९ वी पासून पुढच्या वर्गातील शाळा सुरू होत आहेत. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईलच”, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

“तूर्तास जिथं शाळा सुरू होतायेत, त्यांचा विचार करू. शाळा सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, तर उलट आपल्याला आणखी जबाबदारीने वागावं लागणार आहे. यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. सक्तीने मास्कचा वापर करणं, नियमित हात धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं, शारीरिक अंतर राखणं हे साधे-साधे नियम आतापर्यंत आपल्या सर्वांना पाठ झाले आहेत. नियम साधे असले तरी करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळं याकडं दुर्लक्ष करुन बिलकुल चालणार नाही”, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

“गेली काही महिने नाईलाजाने कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचे भयंकर चटके आपण सहन केले आहेत. लाखो-करोडो लोकांचा रोजगार गेल्याने या लोकांची कुटुंब आज मोठ्या अडचणीत आहेत आणि अशीच परिस्थिती आपल्याला पुन्हा आणायची नसेल, तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या जबाबदारीचं कोणतंही ओझं नाही तर फक्त प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायचीय, एवढं हे सोप्प आहे आणि आपण ते कराल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“मुंबई-ठाण्यासह काही जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं कोणतंही कारण नाही. परिस्थितीनुसार योग्य वेळी इथंही शाळा सुरू होतील. तोपर्यंत शहरात बहुतेक ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहेच. आपण घरून अभ्यास करू शकतो. अवांतर वाचन करून वेळेचा सदुपयोग करू शकतो. त्यामुळं या विद्यार्थ्यांनी कोणतंही टेन्शन घेऊ नये. शाळा सुरू झालेल्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा!!!”, असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 10:41 am

Web Title: school college reopening in maharashtra state mla rohit pawar reaction tweet vjb 91
Next Stories
1 महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल
2 अखेर न्यायालयांचे स्थलांतर
3 सोलापूर ‘एनटीपीसी’मध्ये पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती
Just Now!
X