Maharashtra SSC 10th result 2018: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबर पालकांची तारांबळ उडणार आहे. बहुतांश विद्यार्थी अकरावीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा या मुद्द्यावर गोंधळलेले दिसतात. मात्र या तिन्ही शाखांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

नुकताच शाळेचा उंबरठा ओलांडून अकरावीत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना करिअर निवडताना डगमगायला होतं. यातूनच त्यांच्याकडून चुकीच्या शाखेची निवड केली जाते आणि पुढील आयुष्यात त्यांना पश्चाताप करायची वेळ येते. त्यामुळे आपल्याला ज्या विषयामध्ये आवड आहे अशाच विषयाची निवड महाविद्यालयात प्रवेश घेताना द्यार्थ्यांनी केली पाहिजे. त्यातच सध्या अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेची निवड करताना दिसतात. मात्र विज्ञान शाखा निवडल्यानंतर पुढे काय असा प्रश्न निर्माण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रांकडे वळतात. मात्र विज्ञान शाखेची निवड करुन अन्य क्षेत्रातही करिअर करता येते.

सध्या अनेक विद्यार्थी दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळताना दिसून येतात. मात्र या अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी विद्यार्थ्यांना काही ठराविक शाखेतून बारावी उत्तीर्ण करावी लागते.

१. ज्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्ही, अॅग्री इंजिनीअरिंग , हवाईदल व नौदल या क्षेत्रांची निवड करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतून पूर्ण करणं गरजेचं आहेच. त्यातच या क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषय घेणे आवश्यक आहे.

२. आर्किटेक्चर या विषयात शिक्षण घ्यायचे असेल तर आता गणित या विषयाबरोबरच विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचादेखील अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेची निवड करावी लागेल

३. याप्रमाणेच मेडिकल अभ्यासक्रम, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, फिशरीज सायन्स, ऑप्टोमेट्री, डेंटल मेकॅनिक या क्षेत्रामध्ये करिअर करायची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांना बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास करावा लागेल.

४. सध्या अनेक विद्यार्थ्यांचा कल कृषी क्षेत्राला आधारित अभ्यासक्रमांकडे आहे त्यामुळे या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बीएससीसाठी (बायोटेक्नोलॉजी) बारावी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र विषय घ्यावे लागतील.

५. तसेच फार्मसी पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयासोबत गणित किंवा जीवशास्त्र विषय घेणे आवश्यक आहे.