शरद पवार यांच्या वैद्यकीय उपचारावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परस्परांवर टीकास्त्र डागले आहे. पुन्हा एकदा दोन नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आता जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. त्यांच्या विकारावरून भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी वादग्रस्त टिपणी केली होती. मुश्रीफ यांनी या टिपणीला आक्षेप घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘राजकारणात टीका करताना भान बाळगणे गरजेचे आहे. जिंदाल यांच्या विधानावरून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुश्रीफ यांनी हवे ते करावे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

यावर आज (रविवार) मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. मुश्रीफ म्हणाले, शरद पवार यांच्या आजारावर जिंदाल यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. शिवाय वाझे प्रकरणाशी त्यांचा संबंध जोडला. त्यामुळे भाजपाने माफी मागावी अशी आमची मागणी योग्य होती. पण चंद्रकांत पाटील यांना गुर्मी चढली आहे. त्यांना कोल्हापुरातील एकाही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जागा उरलेली नाही. कोल्हापूर सोडून पुण्यात एका महिलेच्या मतदारसंघातून त्यांना लढावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असभ्य भाषेत बोलणे देखील योग्य नाही.