१० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो.जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिलं जातं आहे. असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात बोलताना केला. राज्य सरकार करोनाबाबत गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत असाही आरोप त्यांनी केला. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्याची अमलबजावणी होत नाहीत.  गरीब रुग्णांनी काय करायचं असा संतप्त सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये करोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या काळात आम्हाला टीका करण्याची हौस नाही मात्र सरकार काय करतं आहे ते दिसतच नाही त्यामुळे बोलावं लागतं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- “आलेला प्रत्येक तिसरा माणूस तिथं मरत असेल, तर ते कोविड सेंटर आहे की मृत्यूचं आगार”

या कोविडच्या काळात आम्ही समजुतीनं वागलो. कोविड बाबत आम्ही काही सरकारला सांगितलं. सरकारला पत्र पाठवली. पण आतापर्यंत एकाही पत्राला उत्तर मिळालं नाही. आज ज्या प्रकारे कामकाज चालवतोय त्यावरून करोनावर गंभीर नाही असं वाटतं. सभागृतील सदस्यांना बोलायचं आहे. करोना पूर परिस्थितीवर चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रात करोनाचं थैमान आहे. पाच राज्यांमध्ये ७० टक्के मृत्यू आहेत. तर त्या ७० टक्क्यांपैकी ५० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहे. आता राज्यात नवे हॉटस्पॉट तयार झालेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मृत्यूचं प्रमाणही वाढलंय. राज्यात भयावय परिस्थिती झाली. महाराष्ट्र भारतात कायम नंबर एक होता. तो करोनात व्हावा अशी आमची इच्छा नव्हती. परंतु आता महाराष्ट्राशी कोणाचीही तुलनाच नाहीये.