कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रातील राजकारणातही दिसत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षामधील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत, महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

”कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली. आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले. म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार!” असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असं कर्नाटक सरकारच्यावतीने सांगण्यात आलेलं आहे.

अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे. बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्याच्या आधी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात मराठा समाजातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

तर, या निर्णयावर महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”सीमावाद हा कर्नाटकसोबतचा मुद्दा आहे. मराठी भाषिकांना महाराष्ट्राचा भाग व्हायचं आहे. ५० कोटींचा निधी हे याचे निराकरण नाही. दोन्ही सरकारने बसून यावर चर्चा करायला हवी.” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.