महाराष्ट्रात आज १६०६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आज ३० हजार ७६ इतकी झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज राज्यात ५२४ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्रात करोनाची बाधा होऊन ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४७ पुरुष तर २० महिला रुग्ण होते. त्यापैकी ३८ जणांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक होते. तर २५ जणांचे वय ४० ते ५९ या वयोगटातील होते. ४ रुग्णांचे वय ४० वर्षे वयापेक्षा कमी होते. ज्या ६७ रुग्णांचा मृत्यू झाला त्यातल्या ४४ रुग्णांना मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग आदी गंभीर आजा होते. महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत ११३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण

मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ३९६ इतकी झाली आहे. आज २३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ६९६ झाली आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.