“भाजपाने आपले दरवाजे उघडले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या व्यतिरिक्त कुणीच शिल्लक राहणार नाही”, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सोलापूर येथे महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना, अमित शाह यांनी “ शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं” असा सवाल केला होता. त्यांच्या या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पवार साहेबांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळे उभारली तेवढे बस स्टँडही शाह यांच्या अख्ख्या गुजरातमध्ये नाहीत. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शाह यांना जोरदार टोला लगावला. शुक्रवारी (ता.20) औरंगाबाद येथे आयोजित मेळाव्यात बोलताना मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. पवारांना महाराष्ट्रातून संपवण्याचा विचार शाह यांनी करू नये, जोपर्यंत तरुण कार्यकर्ते पवारांसोबत आहे. तोपर्यंत राष्ट्रवादीला कुणीही संपवू शकत नसल्याचा दावा मुंडे यांनी केला. त्या काळातही छत्रपतींच्या घरात फूट पाडायचा प्रयत्न काहींनी केला होता, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे नाव न घेता मुंडेंनी टीकास्त्र सोडले. तर, मोदींचं स्वागत करायला राजे रांगेत होते, असे म्हणून त्यांनी उदयनराजेंनाही लक्ष्य केले.

राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात औरंगाबादमध्ये बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यानी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गेल्या आठवड्यात सोलापूर येथे महाजनादेश यात्रेनिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अमित शाह यांनी ‘शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, ते सांगावं?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.