News Flash

पोलिसांचा दरारा असावा दहशत नाही, याचे भान ठेवावे – प्रा. सुरेश नवले

लोकप्रतिनिधींची निष्क्रियता ही नोकरशाहीच्या हुकुमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारी ठरत असल्याचेही म्हटले आहे.

संग्रहीत छायाचित्र

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  राज्यकर्त्यांच्या आवाहनानंतर जनतेने स्वतःला कोंडून घेतले. मात्र गरजेसाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना मारहाण केली जात असुन पत्रकारांना तर शत्रूच समजले जात असल्याच्या घटनांमधुन काही पोलिसांच्या विकृतीचे चित्र उभे राहिले आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची निष्क्रियताच नोकरशाहीच्या हुकुमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संचार बंदीच्या काळात नोकरशाहीकडून होत असलेल्या अधिकाराच्या गैरवापरबाबत लक्ष द्यावे, अन्यथा जनतेतून उद्रेक होईल असा इशारा माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांनी दिला आहे. पोलिसांचा दरारा असावा दहशत नाही याचे भान ठेवावे असे अवाहनही त्यांनी केले.

बीडसह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यकर्त्यांच्या आवाहानानंतर सर्वसामान्य जनतेने चांद्यापासून बांद्यापर्यंत स्वतःला घरामध्ये कोंडून घेतले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना कसलीही विचारपूस न करता रस्त्यावर दिसताच बडवून काढले जात आहे. विहीरीवर पोहायला गेलेल्या  मुलांपासून ते औषध आणायला चाललेल्या सामान्य नागरिकांपर्यंत मारहाण केल्याच्या चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित होत आहेत. पत्रकारांना तर शत्रूच समजले जात आहे. यातून संचार बंदीच्या काळात काही पोलीस कर्मचाऱ्यांची विकृत प्रवृत्तीच दिसत आहे. विचारपूस न करता मारहाणीच्या दहशतीमुळे सामाजिक चित्र गंभीर बनत चालले असल्याचेही प्राध्यापक सुरेश नवले यांनी सांगितले.

व्यक्तिगत अडी-अडचणी बाजूला ठेवून राज्यकर्त्यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद देणारी सामान्य जनता आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. नाविलाज झाला तरच लोक घराच्या बाहेर पडून गरजांची पुर्तता करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी  पोलीस “कडे” करून करडी बडवल्या सारखे माणसं बडवतात,  तुडवतात हा क्रुरपणा संताप वाढवणारा आहे. पोलीसांचा दरारा अपेक्षित आहे दहशत नव्हे, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे असे नवले म्हणाले.

काही पोलिसांच्या अशा कृतीने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होते याची दखल राज्यकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे. एकीकडे उपाशी पोटी लोकांना, घास भरवणाऱ्या पोलिसांच्या चित्रफित पाहून पोलीसातील माणूस जिवंत आहे म्हणून ऊर भरून येतो. तर दुसरीकडे पाठ फोडून काढणार हात दिसतात.  सुखवस्तु लोकांनी गोरगरीब जनतेला घरात रहा म्हणणे सोपे आहे. चार पत्राखाली दहा-दहा माणसांनी उन्हातानात घामाच्या धारा गाळत स्वतःला कोंडून घेणे किती कठीण आहे प्रत्यक्ष  अनुभवल्यावरच कळेल. करोनावर मात करण्यासाठी हेही सहन करून लोक दिवस काढत आहेत हे देखील समजून घेतले पाहिजे. लोकप्रतिनिधींची निष्क्रियता ही नोकरशाहीच्या हुकुमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारी ठरते हे लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावे असे आवाहन माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 9:43 pm

Web Title: there should be no terror of the police prof suresh navale msr 87
Next Stories
1 निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही-उद्धव ठाकरे
2 महाराष्ट्रातील करोनाच्या उपाय योजनांबाबत मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरुन चर्चा
3 PM Cares फंड सुरु करुन मोदींनी सोडली नाही सेल्फ प्रमोशनची संधी-पृथ्वीराज चव्हाण
Just Now!
X