ऑनलाईन अर्ज भरणारे ११३; राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होण्याकडे लक्ष

पहिल्या दिवशी अमावस्येच्या धास्तीने ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास हात आखडता घेणाऱ्या इच्छुकांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. या एकाच दिवशी ८२ इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरले तर तिघांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्षात अर्ज दाखल केले. ऑनलाईन अर्ज भरणाऱ्यांची संख्या आता एकूण ११३ झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस उलटूनही राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत रविवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शिवसेनेची यादी जाहीर होण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी आहे. भाजपने शनिवारी यादी जाहीर करणे टाळले.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी सुरूवात झाली. ३ फेब्रुवारीपर्यंत ही मुदत आहे. प्रत्येकाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. त्यासोबत शपथपत्रे व सहपत्रे जोडावी लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. पहिला दिवस अमावस्येचा असल्याने बहुतेकांनी ऑनलाईन अर्ज भरला नव्हता. दुसऱ्या दिवशीपासून ही प्रक्रिया गतिमान झाल्याचे दिसत आहे. या दिवशी ८२ जणांनी ऑनलाईन अर्ज भरले तर तीन उमेदवारांनी ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे ते सादर केल्याची माहिती पालिकेने दिली. रविवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना बहुतांश इच्छुकांचे लक्ष राजकीय पक्षांच्या उमेदवारीकडे आहे.

सेना आणि भाजप या पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. लवकर यादी जाहीर झाल्यास बंडखोरीला उधाण येईल अशी धास्ती असल्याने संबंधितांकडून विद्यमान नगरसेवक वगळता उर्वरित जागांवरील यादी अंतिम क्षणी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. भाजपने शनिवारी पहिली यादी जाहीर करण्याचे म्हटले होते. परंतु, त्यांनी या दिवशी यादी जाहीर केली नाही. शिवसेनेकडून वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात यादी जाहीर होईल, असे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा तिढा सुटला नसल्याने दोन्ही पक्षांची यादी जाहीर झालेली नाही. रविवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर व राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे यांनी दिली. या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर उमेदवारी यादी जाहीर करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मनसे ३० किंवा ३१ जानेवारीला यादी जाहीर करणार आहे.