चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी रात्री एका पाच वर्षीय मुलासह तीन नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४२ झाली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील ४३ वर्षीय एका बाधितांची ३३ वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अन्य एक बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधिताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ इतकी झाली आहे. आतापर्यत २३ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टिव्ह बाधितांची संख्या आता १९ आहे.