उन्हाळी सुटय़ा आणि लग्नाचा हंगाम यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेस नेते, पदाधिकारी पांगलेले.. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण मुंबईत. दोन स्थानिक आमदार तिकडेच. अशा स्थितीत गुरुवारी दुपारी अचानक संदेश आला. पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी नांदेडला येत आहेत आणि मग सुरू झाली संदेशांची देवाण-घेवाण अन् आवश्यक त्या व्यवस्थांची जुळवाजुळव!                                           राहुल गांधी यांच्या तेलंगणातील नियोजित दौऱ्याला आधी हैदराबाद ते निर्मल असा मार्ग ठरला होता. पण निर्मलला जाण्यासाठी नांदेडहून रस्तामार्गे जाणे अधिक सोयीचे ठरते, असे लक्षात आल्यानंतर त्यांच्या प्रवासाच्या मार्गात झालेला बदल पोलीस प्रशासनासह पक्षाच्या यंत्रणेला कळविण्यात येताच दुपारनंतर सर्वाचीच धावपळ सुरू झाली. काही वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हेलिकॉप्टर अचानक वसमतनगरीत पटांगणावर उतरवावे लागले. नंतर त्या अचानक नांदेडमध्ये आल्या. काँग्रेस नेते दिवंगत शंकरराव चव्हाण तेव्हा पुढील व्यवस्थेसाठी शहरात हजर होते. त्यानंतर सुमारे ४० वर्षांनी इंदिराजींच्या नातवाच्या हवाई प्रवासाच्या मार्गात अचानक झालेल्या बदलाची माहिती येथे मिळाल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम व पदाधिकाऱ्यांची दुपारी अडीचनंतर लगबग सुरू झाली. नायगावचे आमदार वसंतराव चव्हाण शहरात दाखल झाले. महापौरांचे पती किशोर स्वामी बासरला होते, तेही तातडीने परतले. केदार पाटील साळुंके, रावसाहेब मोरे, संतोष पांडागळे आदी काँग्रेस कार्यालयात एकत्र आले. मग विमानतळाच्या इमारतीत प्रवेश मिळण्यासाठी पोलिसांकडे सुरक्षा पास मागण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण कागदी पासेस देण्याऐवजी काँग्रेसच्या २५जणांना इमारतीत प्रवेश देण्याचे पोलीस प्रमुखांनी मान्य केले.                                                                                                     दरम्यान, एस. पी. जी.कडून स्थानिक पोलीस प्रशासनाला राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर बंदोबस्तासह इतर बाबींची त्वरेने पूर्तता झाली. विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित झाली. स्थानिक पातळीवर व्यवस्थेची माहिती घेताना खासदार चव्हाण मुंबईहून जिल्हाध्यक्षांना सूचनाही देत होते.                                                                                                                                                        संध्याकाळी सातच्या सुमारास राहुल गांधी यांचे नवी दिल्लीहून विशेष विमानाने येथे आगमन झाले. महापौर शैलजा किशोर स्वामी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जि. प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. काही वेळ विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात थांबून राहुल गांधी निर्मल गावी नियोजित मुक्कामी भेटीसाठी रवाना झाले. येथे मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी उद्या (शुक्रवारी) निर्मल येथून १६ किलोमीटरची पदयात्रा काढणार आहेत. त्या भागातील एका खेडय़ाला भेट देऊन दुपारनंतर पुन्हा नांदेडला येतील व येथून दिल्लीकडे रवाना होतील.