शेतातील पिकांना कालव्याचे पाणी देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पुतण्याने चुलत्यासह दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून नंतर स्वत: आत्महत्या केली. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हा प्रकार घडला.
रणजित रामकृष्ण शिंदे (२५) असे हल्लेखोर तथा आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या हल्ल्यात त्याचे चुलते भालचंद्र अनंत शिंदे (५४) तसेच हे भांडण सोडविण्यासाठी आलेले शेजारचे शेतकरी शिवाजी रामचंद्र माने हे दोघे गंभीर जखमी झाले. भालचंद्र शिंदे व शिवाजी माने हे दोघे वेळापुरात अजित शिवाजी श्िंादे यांच्या शेतालगत उभे होते. त्या वेळी भालचंद्र यांचा पुतण्या रणजित शिंदे हातात कोयता घेऊन तेथे आला. शेतातील पिकांना कालव्यातून पाणी का घेऊ देऊ नाही, विरोध का करता, असा जाब विचारत चुलते भालचंद्र यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात रणजित याने हातातील कोयत्याने चुलत्यावर सपासप वार केले. त्या वेळी सोबतचे शिवाजी माने यांनी भालचंद्र यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता रणजितने त्यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात भालचंद्र व शिवाजी हे दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर रणजित याचे मानसिक संतुलन आणखी बिघडले. त्यातूनच त्याने त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. वेळापूर पोलीस ठाण्यात मृत रणजित शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर हे पुढील तपास करीत आहेत.  
पुरातत्त्व कायद्याचा भंग
सोलापूर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात हॉटेलच्या नव्या बांधकामात दुरुस्ती केली व भारतीय पुरातत्त्व वास्तुसंरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी शंकर शिवाजी जाधव (रा. माजी गुन्हेगार मुक्त वसाहत, सोलापूर) यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी भागवत न्हावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर जाधव हे भुईकोट किल्ल्यालगत लकी चौकात दुर्गा हॉटेलच्या इमारतीचे बेकायदा बांधकाम करताना आढळून आले.