मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. आता भाजपासोबतही मला तितकाच किंबहूना त्याहून अधिक काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे तोवर मी इथेच आहे. नंतर मी हवेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे सध्या भाजपाला साथ देणारे रामदास आठवले हे आगामी काळात भाजपाची साथ सोडणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.

रामदास आठवले हे शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खानही उपस्थित होते. भाषणादरम्यान नसीम खान यांनी रामदास आठवले यांना काँग्रेससोबत येण्याचे आवाहन केले. यावर रामदास आठवले म्हणाले, मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. आता मी भाजपासोबत असून त्यांच्यासोबतही मला तितकाच राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी इथेच आहे.  मी हवा पाहून अंदाज ठरवत असतो. त्यामुळे मी हवा कोणत्या दिशेने जातेय, याचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले.

मला खूप दिवसांनी मंत्रिपद मिळाले आहे. अर्थात मी मंत्री आहे म्हणून मला जनतेचा पाठिंबा आहे, अशी परिस्थिती नाही. मी मंत्रिपदावर नसलो तरी जनता माझ्या पाठिशी उभी राहील, असा दावाही त्यांनी कार्यक्रमात केला.