बँकेचा नमुनाही ६६ रकान्यांचा; प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने विलंब लागण्याची चिन्हे

कर्जमाफीचे शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून दिल्यानंतर आता बँकांना प्रत्येक कर्जदाराची माहिती ६६ रकान्यांमध्ये भरायची आहे. एका कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरण्यासाठी साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांपर्यंतचा वेळ लागतो. जिल्ह्य़ातील बँकेच्या शाखांची संख्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या कामासाठी किमान २५ दिवस लागू शकतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जदार लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्यांचे चावडी वाचन करावे लागणार आहे. त्यानंतर तहसीलदारांसह तीन जणांच्या समितीने या यादीवरील आक्षेप नोंदवून घ्यायचे आहेत. परिणामी कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबरमध्ये बँक खात्यावर जमा होण्याचा सरकारकडून सांगितला जाणारा मुहूर्त पाळणे अशक्य असल्याचे अधिकारी सांगत आहेत. कर्जमाफी आणि डोकेदुखी अशी नवी म्हण विकसित व्हावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कर्जमाफीचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाला. कर्जमाफीकरिता पात्र होण्याकरिता सरकारने घातलेल्या अटींवरून बराच गदारोळ झाल्यावर सरकारने आदेशात बदल केला. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची घालण्यात आलेली अटच वादात अडकली.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असले तरी त्यांना ज्या बँकेतून कर्ज घेतले आहेत तेथे पुन्हा आधारकार्ड जमा करणे आवश्यक आहे. एखाद्याने दोन बँकांमधून कर्ज घेतले असल्यास दोन्ही बँकांमध्ये आधारकार्ड देणे आवश्यक आहे. पती-पत्नीने कर्जमाफीसाठी स्वतंत्र अर्ज केले असतील तर दोन्ही अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आधिक आहे. महिला प्राधान्य असा कर्जमाफीतील निकष असल्याने ते कर्ज माफ होईल. मराठवाडय़ात आतापर्यंत ३० लाख ९ हजार ८९१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ९६ हजार ४९२ शेतकरी लाभार्थी असल्याची माहिती सहकार विभागात उपलब्ध आहे. मात्र बँकांकडील ही माहिती भरल्यानंतर जाहीर वाचन करून त्यावर आक्षेप मागविले जाणार असल्याने गावागावांत आक्षेपांचे मोठे राजकारण होईल, असे अधिकाऱ्यांना वाटते.

राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सरासरी दोन हजार असल्याने त्या सर्वाचे अर्ज भरण्यासाठी लागणारा कालावधी कर्मचाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. काही बँकांमधून अर्ज भरण्यास अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेत नवी गुंतागुंत निर्माण झाली आहे. जिल्हा बँकांच्या स्तरावर एका सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती भरली जात आहे. ही माहिती भरण्यास लागणारा कालावधी आणि याद्यांचे पुन्हा वाचन होणार असल्याने कर्जमाफीची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात भरणे अवघड जाईल, असेच वाटत असल्याचे बँकेतील अधिकारी सांगत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही आलेले अर्ज आणि बँकांची माहिती भरतो आहोत. एका अर्जासाठी २० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. त्यात ग्रामीण भागात इंटरनेट जोडणी नीट नसेल तर अधिक वेळ लागतो. आम्ही १६० अधिकारी अर्जातील ६६ रकाने भरत आहोत. आमचे केवळ २५ अर्ज भरले गेले आहेत. ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची आहे. त्यामुळे वेळ लागू शकतो.  – प्रदीप कुतवळ, अग्रणी बँक  अधिकारी