राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. दरम्यान त्याआधी एक्झिट पोल समोर आले असून अनेकांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असा स्पष्ट अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकदा विरोधी बाकावर विराजमान होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मनसेची एक्झिट पोलमध्ये दखलही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या हाती पुन्हा एकदा निराशा पडण्याची शक्यता आहे.

निकालाचे सगळे टप्पे संपल्यावर एक्झिट पोल दाखवला जातो. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावरच अशा प्रकारचा एक्झिट पोल दाखवला जावा असा भारतात नियम आहे. एक्झिट पोलमध्ये निकालाचा ढोबळमानाने अंदाज वर्तवला जातो. आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.

महायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज
#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र’ सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज
राज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार

ओपिनियन पोल आणि सर्व्हे या दोन्हीपेक्षा एक्झिट पोल वेगळा ठरतो. त्यामुळेच हा एक्झिट पोल बऱ्याच अंशी निकालाच्या जवळ जाणारा ठरतो. ज्या दिवशी मतदान होते त्याच दिवशी माहिती गोळा केली जाते. देशात कोणत्या टप्प्यांमध्ये किती टक्के मतदान झाले? नवमतदार किती होते? साधारण मतदारांचा कौल कुणाच्या दिशेने आहे? मतदारांचा राग कोणत्या पक्षावर आहे? मतदारांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून कोणता नेता हवा आहे? कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक वाटते? हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्याची जी उत्तरं येतात त्यावरून निवडणुकीचे सगळे टप्पे संपल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज बांधला जातो. जनभावना काय असू शकते याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला असल्याने तो निकालाच्या जवळ जाणारा ठरतो. भारतात एक्झिट पोल मतदानाचे सगळे टप्पे संपल्यावरच दाखवण्यास परवानगी आहे.

सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात.

लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. आता गुरुवारी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यावेळी एक्झिट पोलचे अंदाज कितपत योग्य होते हे समोर येईल.