कोथरुड विधानसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी फेटाळल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मला मोठमोठ्या नेत्यांकडून उमेदवारीविषयी विचारणा झाली, मात्र मी ही निवडणूक लढवणार नाही, असं तरडेंनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना स्पष्ट केलं. महाआघाडीने कोथरुड मतदारसंघाची जागा मित्रपक्षांना सोडली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जागा लढवणार असल्याचं समजतंय. त्याकरिता उमेदवाराची चाचपणी सुरु झाली असून ‘मुळशी पॅटर्न’ फेम प्रवीण तरडे यांना विचारणा झाल्याची चर्चा होती.
भाजपाचे उमेदवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रवीण तरडेंची सदिच्छा भेट घेतली. याविषयी सांगताना तरडे म्हणाले, ”चंद्रकांतदादांची माझी भेट एक कलाकार म्हणून घेतली. कोथरुडमधल्या अनेकांची भेट ते घेत होते. निवडणूक हा विषयच नव्हता. बड्या नेत्यांकडून मला उमेदवारीसाठी विचारणा झाली. पण मला राजकीय पार्श्वभूमीच नाही. साधा उमेदवारीचा अर्जसुद्धा कसं भरतात हे मला ठाऊक नाही. सिनेमा हीच माझी पार्श्वभूमी आहे. मी जर राजकारणात आलो आणि सिनेमा सुटला तर मी जगूच शकणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यास माझा नकार आहे.”
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्याअंतर्गत ही भेट झाली होती. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चंद्रकांत पाटील व तरडे यांच्यात चर्चा झाली. यावेळी प्रवीण तरडेंनी त्यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे पोस्टर आणि पुस्तक चंद्रकांत पाटील यांना भेट दिले.