चक्रीवादळाच्या तडाख्याने हापूस हंगाम संपुष्टात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी / नवी मुंबई : पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णत: होलपटले गेले आहेत. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाच, पण उत्पन्न देणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. या दुहेरी अस्मानी संकटामुळे बागायतदारांचे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मेच्या दुसऱ्या आठवडय़ापासून खऱ्या अर्थाने शेवटच्या हंगामातील हापूस आंबा काढून मुंबई, पुण्याच्या बाजारात पाठविला जात असल्याने बागायतदारांना उत्पन्नाची संधी असते, मात्र शेवटच्या हंगामातील हापूस घाऊक बाजारपेठेत पाठविण्याच्या काळातच चक्रीवादळाने तडाखा दिल्याने बागायतदारांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच वातावरणातील बदलांमुळे मार्चमध्ये येणारे पहिल्या टप्प्यातील आंबा उत्पादन फारसे आलेच नाही. त्यामुळे हंगाम लांबला. १० एप्रिलपासून बाजारात खऱ्या अर्थाने हापूस आंबा दिसू लागला होता. गेल्या १५ दिवसांत वाशी बाजारातही रत्नागिरी जिल्ह्य़ातून दिवसाकाठी ३० हजार पेटय़ा जात होत्या. मोहोर उशिरा आल्याने १५ ते ३१ मे या कालावधीत जास्त उत्पादन हाती येईल, अशी शक्यता होती. हा शेवटच्या टप्प्यातील आंबा जास्त प्रमाणात तयार होत होता; पण वादळाने होत्याचे नव्हते केले आहे.

गेल्या वर्षी मोहोर लागण्याच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोहोर गळून पडला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा मोहोर आणि फळधारणा होताना जानेवारी-फेब्रुवारी उजाडला. त्यामुळे हापूसचा हंगाम यंदा लांबणीवर पडणार असे स्पष्ट दिसत होते. ऑक्टोबरपासून नैसर्गिक संकटे उद्भवल्यामुळे यंदा हापूसचे उत्पादनच ६० टक्क्यांनी घटले होते. त्यामुळे ४० टक्के उत्पादन घेणाऱ्या हापूस आंबा बागायतदारांना यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा होती, मात्र फेब्रुवारीपासून करोना साथीची दुसरी लाट पसरल्याने बागायतदारांना आंब्याचा मुक्त व्यापार करताना अडचण आली. त्यावर मात करून कोकणातील हापूस आंबा बागातयदारांनी थेट पणन सुरू केले, तर परंपरागत घाऊक बाजारात आंबा पाठविण्याची परंपरा गुढीपाडव्यापासून काही बागायतदारांनी कायम ठेवली.

तुर्भे येथील सर्वात मोठय़ा फळबाजारात यंदा हापूसच्या २४ लाख पेटय़ा आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वसाधारणपणे हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम मेमध्ये सुरू होतो. या महिन्यात एक ते सव्वा लाख पेटय़ा घाऊक बाजारात येतात, मात्र यंदा ही आवक ५२ हजार पेटय़ा एवढीच राहिली. कमी उत्पादन असल्याने हापूसचे दर प्रति डझन ५०० रुपये असे चढेच होते. त्यामुळे शेवटच्या हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, अशा आशेवर बागायतदार होते; पण वादळाने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे.

दुहेरी नुकसान

रविवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात धुमाकूळ घातल्यानंतर हे वादळ दुपारी रत्नागिरी जिल्ह्य़ात दाखल झाले. या वादळामुळे काढणीयोग्य आंब्यापासून ते कैरीपर्यंतची सर्वच टप्प्यांतील फळे गळून पडली. अनेक ठिकाणी लागती झाडे वेगवान वाऱ्यामुळे उभी चिरली गेली आणि मोडून कोसळली. या दुहेरी संकटामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

उत्पन्नाचे साधन नष्ट

अतिवेगवान वारा आणि मुसळधार पावसाचा मारा यामुळे अनेक मोठमोठी आंब्याची झाडे मुळापासून उन्मळून कोसळली आहेत. वर्षांनुवर्षे उत्पन्न देणारी ही झाडे धारातीर्थी पडल्याने बागायतदारांचे भविष्यातील उत्पन्नाचे साधन कायमचे नष्ट झाले आहे. ही हानी कधीही भरून येणार नसल्याने बागायतदारांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.

ही कहाणी प्रत्येकाचीच!

चक्राकार पिळवटून टाकणाऱ्या वाऱ्याच्या माऱ्यातही जी झाडे तग धरून राहिली, त्यांच्याखाली काढणीस तयार फळांचा सडा पडला आहे. रत्नागिरी येथील एक बागायतदार शैलेश सावंत यांच्या बागेतील १५ ते २० लाखांची फळे मातीमोल झाली आहेत. कमी-अधिक प्रमाणात सर्वच बागायतदारांची हीच कहाणी आहे. वादळात झाडावर टिकून राहिलेला आंबा फाद्यांना घासून खराब झाला आहे. तो प्रक्रियेसाठी कमी दरात कारखान्यात पाठविण्याशिवाय पर्याय नाही, तर झाडावरून पडलेला आंबा कॅनिंगच्या योग्यतेचा नाही, असे बागायतदारांचे दु:ख आहे.

आंबा हंगाम संपल्यात जमा आहे. हंगामाच्या पहिल्या आणि मधल्या टप्प्यातील आंबा उत्पादनाच्या विक्रीतून शेतकऱ्याचे सगळे खर्च भरून येतात आणि हा शेवटच्या टप्प्यातील आंबा त्याला खरा नफा मिळवून देत असतो; पण वादळाने तोच हिरावला आहे. 

– तुकाराम घवाळी, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था 

हापूस आंब्याचा व्यापार हा सर्वात मोठा व्यापार आहे. चक्रीवादळामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा आकडा १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

– संजय पानसरे, संचालक, एपीएमसी, फळबाजार, नवी मुंबई

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 crore estimate loss to mango growers due to cyclone tauktae zws
First published on: 19-05-2021 at 02:25 IST