लोकसत्ता वार्ताहर जालना –  पुसदहून मुंबईला  जाणारी बस एका खड्ड्यात  उलटून झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले. मंठा ते केंधळी पाटीजवळ मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बसमध्ये एकूण ४२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून जालना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आल्याचे मंठा ग्रामीण रूग्णालयाकडून सांगण्यात आले. बसच्या समोर ट्रक आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बस एका दुचाकीला धडकून मोठ्या खड्डयात कोसळल्याचे  काही प्रवाशांनी सांगितले. घटनास्थळी तत्काळ धाव घेत पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.