सांगली : एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात रविवारी ४२ ठिकाणी एकाचवेळी श्रमदान करून ७० टन कचरा संकलन केले. या उपक्रमामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने आदींसह २३ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला.
महापालिकेच्यावतीने सांगली, मिरज व कुपवाड शहरात ४२ ठिकाणी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथे उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावैळी उपायुक्त स्मृती पाटील यांनीही सक्रिय सहभाग घेत वैद्यकीय महाविद्यालयात अडगळीच्या जागी असलेला झाडझाडोरा हटविला.
हेही वाचा – शरद पवार यांचे सूचक विधान, म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण…’
सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, महापालिका प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, उपायुक्त राहुल रोकडे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच कुपवाड येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.
या उपक्रमामध्ये विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. तसेच महापालिका कर्मचारी, अधिकारी यांनीही सहभाग घेतला. आजच्या उपक्रमात सुमारे ७० टन कचरा संकलित करण्यात आला. येत्या काळामध्ये स्वच्छता मोहीम व्यापक स्वरुपात करण्यात येणार असल्याने प्रत्येक नागरिकांनी देश कार्य म्हणून स्वच्छतेच्या मोहिमेत आपला सहभाग जास्तीत जास्त नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासक पवार यांनी केले.