कोल्हापूर : हातकणंगले, कागल तालुक्यातून पुढे जाणारा शक्तिपीठ प्रकल्प वळवून तो गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून नेण्याचा प्रयत्न आमदार शिवाजीराव पाटील करीत आहेत. हा प्रकार अयोग्य आहे. नव्याने बदलण्यात येणाऱ्या भागातही प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध राहील, असा इशारा गडहिंग्लज येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात देण्यात आला.

शक्तिपीठ प्रकल्पावरून कोल्हापूर जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्गावर विरोध करणारे आंदोलन नुकतेच पार पडले. यानंतर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी जिल्ह्याच्या दक्षिण भागातून हा प्रकल्प नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नाला भाजप, ठाकरे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, जनता दल, डावे आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचे गडहिंग्लज येथे झालेल्या बैठकीत दिसून आले.

शक्तिपीठविरोधी समितीचे समन्वयक, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, अजित पवार राष्ट्रवादीचे जयसिंग चव्हाण, अमर पाटील, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, बैठकीचे अध्यक्ष संपत देसाई यांनी शक्तिपीठ प्रकल्पाला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात विरोध आहे. सह्याद्री पर्वतरांगेसारख्या संवेदनशील भागातून हा प्रकल्प नेला जाणार असल्याने पर्यावरणाची हानी होणार असल्याने या प्रकल्पाला सर्व शक्तिनिशी विरोध करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मंत्री, आमदारांवर टीकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना भुलवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. आता आमदार पाटील यांच्या प्रयत्नाला मुश्रीफ संमती असल्याचे दाखवत आहेत. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका जनता दलाच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केली. चंदगड मतदारसंघ चुकीच्या माणसाच्या हातात दिल्याने त्याची किंमत शक्तिपीठ प्रकल्पाच्या माध्यमातून जनतेला मोजावी लागेल, अशी टीका भाजपचे संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवाजी पाटील यांच्यावर केली.