Aaditya Thackeray : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. हा तणाव असतानाही हॉकी आशिया कप आणि ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला भारतात परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्यांवरून आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला सवाल विचारत भारत हॉकी आणि क्रिकेट आशिया कप पाकिस्तानबरोबर खेळणार की नाही? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“पहलगाममध्ये एप्रिलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यातील दहशतवादी अजूनही कुठे फरार आहेत हे कोणालाही माहिती नाही. त्यांना अद्यापही पकडण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणांनी सांगितलं की दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर जे स्केच जारी करण्यात आले होते, ते चुकीचे होते. ऑपरेशन सिंदूरनंतर आपण जगभरात शिष्टमंडळाच्या माध्यमातून भूमिका मांडली. मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण यावर भाजपाला वाटत असेल की आपण मते मिळवू शकतो, लोकांना फसवू शकतो. मात्र, हे चालणार नाही. यावर केंद्र सरकारने देशाला उत्तर देण्याची गरज आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे, मग आपल्या देशात होणाऱ्या हॉकी आशिया कप आणि यूएईमध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या अशिया कपमध्ये भारत पाकिस्तानबरोबर खेळणार की नाही? यावर केंद्र सरकारचं उत्तर आम्हाला हवं आहे. जर तुम्ही पाकिस्तानबरोबर खेळलात तर ही संस्था देशद्रोही ठरवणार का? यावरून माझं लक्ष केंद्राकडे आहे. कारण आपण पाहत आहोत की काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. आशियाई विकास बँक असेल किंवा वर्ल्ड बँक असेल किंवा आयएमएफ असेल कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तानला फंड देत आहेत, मग असं असताना आपले परराष्ट्र मंत्री काय करत आहेत?”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मेळाव्याचं कोणालाही अधिकृत निमंत्रण नाही

हिंदी भाषा सक्तीचा निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून ५ जुलै रोजी मुंबईत एकत्र मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “मेळाव्याचं कोणालाही अधिकृत निमंत्रण जात नाही. जे कोणी महाराष्ट्र प्रेमी, मराठी प्रेमी आहेत, मग ते कोणत्याही पक्षात असतील तर त्यांनी मेळाव्याला यावं. कारण हा आपल्या एकतेचा विजय आहे. जी हिंदीची सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीच्या मुलांवर लादणार होते, पण आपण आपली शक्ती दाखवली आणि तो निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत. त्यामुळे यासाठी कोणाच्या निमंत्रण किंवा आमंत्रणाची वाट पाहू नका”, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंची रामदास कदम यांच्यावर जहरी टीका

उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम होतो हे त्यांचं उदाहरण आहे. ज्या व्यक्तीचा निवडणुकीत दोनवेळा पराभव झाल्यानंतर देखील विधानपरिषद दिली, मंत्री पदे दिले, पण तरीही ते पळून गेले. त्या व्यक्तींवर मी आता बोलू इच्छित नाही”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.