राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील अनेक आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे. “अमोल मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावे लागेल,” असे म्हणत सत्तारांनी मिटकरींवर हल्ला चढवला. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) अकोला दौऱ्यावर असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पत्रकारांनी मिटकरींनी केलेल्या दाव्याविषयी विचारलं असता अब्दुल सत्तार यांना म्हणाले, “अमोल मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावे लागेल. त्यांना नेमकी काय अडचण आहे हे डॉक्टरच सांगू शकतील.”

अमोल मिटकरी काय म्हणाले होते?

आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारमधील अनेक आमदार आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याशिवाय मिटकरींनी अब्दुल सत्तार यांच्यावर कृषीमंत्रीपदावरूनदेखील निशाणा साधला होता. शरद पवार यांच्याकडून कृषी खाते सांभाळणे शिकावे, असा सल्ला त्यांनी सत्तार यांना दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू

“मिटकरीसुद्धा आमच्या संपर्कात”

अमोल मिटकरींच्या या विधानाचा कृषीमंत्री सत्तार यांनी खरपूस समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ”आमच्याकडील लोक राष्ट्रवादीत कशाला जाणार, उलट राष्ट्रवादीतून अनेक जण आमच्याकडे येत आहेत.” मिटकरीसुद्धा आमच्या संपर्कात आहेत, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.