दहीहंडीला पुण्यात गेलो नसतानाही गुन्हा कसा काय दाखल करु शकतात?- संतोष जुवेकर

पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

santosh juvekar
संतोष जुवेकर
पुण्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमाला मी हजेरी लावलीच नव्हती, तरीसुद्धा माझ्याविरुद्धा गुन्हा का दाखल करण्यात आला असा सवाल अभिनेता संतोष जुवेकरने केला आहे. पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात संतोष जुवेकरसह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मी कोणत्याच दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचं त्याने सांगितलं.

‘दहीहंडीच्या दिवशी मी दिवसभर माझ्या ठाणे इथल्या घरी होतो. पुण्यात मी गेलोच नव्हतो. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी किमान शहानिशा तरी करायला पाहिजे. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाकडून मला आमंत्रणदेखील नव्हतं. इतकंच काय तर त्यांनी माझ्या परवानगीविना मंडळाच्या बॅनरवर माझा फोटो वापरला. याबद्दल मीच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला हवी. माझ्या वकीलांशी बोलून या प्रकरणात पुढे योग्य ते पाऊल उचलेन,’ अशी माहिती जुवेकरने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. जर जुवेकर कार्यक्रमास नसतील तर गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण, पोलिसांच्या आदेशाचा भंग, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी जुवेकर आणि अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंड मालक विजय नरुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांनी तक्रार दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor santosh juvekar statement on case filed against him in pune