सातारा : ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक तब्बल २२ तासांनंतर समाप्त झाली. सातारा येथील पालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सायंकाळी साडेपाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मान्यवर मंडळच्या गणेश मूर्ती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या.
मिरवणुकीत ‘आवाजाच्या भिंतीं’चा नियमानुसार आवाजात उत्साहपूर्ण वातावरणात नाचणारी तरुणाई, पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, कुठे लेझीमचे झंकार आणि मध्येच भिजलेल्या डोळ्यांनी, हात जोडून बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या, असे साकडे गणरायाला घालणारे सातारकर नागरिक अशा मोठ्या उत्साहपूर्ण आणि गर्दीच्या वातावरणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक पार पडली. सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक रविवारी १२ वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेश मूर्तीचे तळ्यात विसर्जन झाल्यावर समाप्त झाली. काल रात्री बारापर्यंत मंडळांकडून दणदणाटाला उधाण आले होते.
यावर्षी प्रथमच मानाच्या पाच महागणपतीची आरती मध्यरात्री राजवाडा परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करून या विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच आनंद उपस्थितांना मिळाला. रात्री बारानंतर मंडळांपुढील सर्व वाद्य थांबवून पोलिसांनी मंडळांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी पुढे नेण्यासाठी घाई करण्यास सुरुवात केली. पावसात सायंकाळी सहा वाजल्यापासून राजवाडा, मोती चौक, सदाशिव पेठ, राजपथ हा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. विविध मंडळांच्या स्वागतासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागत कक्षात उपस्थित होते. रात्री उशिरा अनेक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून त्यांनीही मंडळाच्या पुढे स्वागत करून ठेका धरला. शिवेंद्रसिंहराजेंच्या सहभागाने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व वाद्यसंगीत यामुळे या मिरवणुकीला एक वेगळाच नजारा प्राप्त झाला होता. रात्री आठ ते बारा या वेळेत ही विसर्जन मिरवणूक अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती. मात्र, रात्री बारानंतर वाद्य वाजवण्यास आणि थांबवण्यास पोलीस प्रशासनाने सांगितल्यानंतर या मिरवणुकीने विसर्जनासाठी वेग घेतला. अनेक मंडळांच्या गणेश मूर्ती अतिशय महाकाय उंचीच्या असल्यामुळे त्या विसर्जन मिरवणूक मार्गावरून नेताना वारंवार अडथळे येत होते. आज सकाळी १२च्या सुमारास शनिवार पेठेतील राहुल परदेशी यांनी बनवलेल्या व मानाच्या शंकर-पार्वती गणेशाची मिरवणूक विसर्जनाने संपन्न झाली.
तत्पूर्वी सकाळीच सातारा शहरातील मानाचा नवसाला पावणारा महासम्राट गणपती सदाशिव पेठ येथील पंचमुखी गणेश मंडळ अर्थात प्रताप मंडळ शनिवार पेठ येथील मान्यवर मंडळ तसेच मल्हार पेठ येथील मंडळाची मिरवणूक काढण्यात आली होती. अनेक गणेश मंडळांनी सहभागी होत आपापल्या पद्धतीने सायंकाळपर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन नेमून दिलेल्या विसर्जन तळ्यामध्ये केले. जिल्हा प्रशासनाने मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची फौज वाढवून आणि ठिकठिकाणी होमगार्ड व स्वयंसेवकांची मदत घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडली. सातारा येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने पोलीस, होमगार्ड यांना भोजन पाकिटांचे वितरण केले.
मानाचा महागणपती सम्राट मंडळाची मिरवणूक तब्बल २२ तासांनी म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजता संपली. या मिरवणुकीत सर्वांत शेवटी शनिवार पेठ येथील नवसाला पावणारा मानाचा शंकर-पार्वती गणेशाची मूर्ती विसर्जन करून या सोहळ्याची सांगता झाली.दरम्यान, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ढोलताशाच्या तालावर मिरवणुकी दरम्यान स्वागत कक्षापुढे नाचण्याचा आनंद लुटला.
नगरपरिषदेच्या सातारा विकास आघाडीनेही कन्याशाळेजवळ भव्य मंच उभारून तेथून जाणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्ष आणि नगर विकास आघाडीच्या वतीने राजपथावर भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. रविवारी सकाळी मानाचे पाच गणपती विसर्जन करण्याकरता उशीर होत असल्यामुळे शनिवार पेठेतील शंकर पार्वती गणेशाची मूर्ती दर्शनासाठी राजवाडा परिसरातील मोती चौकात भाविकांसाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे रविवारीही सकाळी अनेक सातारकर नागरिकांनी या शंकर पार्वती गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. पालकमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे सातारा शहरासह जिल्ह्यातील मिरवणुकांवर लक्ष होते. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वाई येथील मानाच्या गणपतीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली. शुक्रवारी सातारा शहरातील ४५ मंडळांनी विसर्जन केले होते. महाबळेश्वर येथे आवाजाच्या भिंतींचा वापर केल्याने सहा मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ प्रकार वगळता फलटण, कोरेगाव, म्हसवड, लोणंद, खंडाळा, वाईसह जिल्ह्यात इतरत्र शांततेत मिरवणूक पार पडली.