अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासंदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राहुरीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर, ज्ञानेश्वर जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक त्रिभुवन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, आयुब पठाण, नवाज देशमुख, किरण कडू, ज्ञानेश्वर कुटे, ज्ञानेश्वर जगधने, बाळासाहेब आघाव आदींनी पडळकर यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

या वेळी माजी आमदार तनपुरे यांनी, भाजपने त्वरित गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा त्याची योग्य ती दखल राष्ट्रवादी घेईल, असा इशारा दिला. यापूर्वी गोपीचंद पडळकर राहुरीमध्ये आले असताना त्यांनी राहुरीचे दैवत बिरोबाची शपथ घेत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याचा लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना पडळकर यांनी स्वतःचे भले करून घेतले आणि समाजाला वाऱ्यावर सोडले, अशी टीका रामदास बाचकर यांनी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा जोरदार निषेध केला.

खासदार लंके, जिल्हाध्यक्षांकडून निषेध

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा खासदार नीलेश लंके यांनी निषेध केला व महाराष्ट्रातील जनतेने या नीच वक्तव्याविरोधात आवाज उठवावा, असेही आवाहन केले. अशा निंदनीय वक्तव्याला महाराष्ट्रात कधीही जागा नाही, पडळकर यांच्यासारख्या वक्तव्यामुळेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसत आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही शिष्टाचार, आदब यावर परंपरेने आधारलेली आहे. या परंपरेला या वक्तव्याने धक्का बसला आहे, असेही खासदार लंके यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत नीच वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई भाजपने करावी, अशी मागणी केली. पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा घोर अपमान केला आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वावर बोलण्याचा पडळकर यांना कवडीचाही अधिकार नाही. विरोधकांवर टीका करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, परंतु त्यासाठी अश्लील भाषेचा वापर करणे लाजिरवाणे आहे. अभिव्यक्तीचि वापर संयमाने करायला हवा, असा सल्ला फाळके यांनी दिला आहे.