अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील पिकाचे १ लाख हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे मोठे नुकसान झाले. आपत्ती काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देतानाच अधिक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री विखे पाटील यांनी आज, मंगळवारी पाहणी केली. शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत धीर दिला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उप विभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील व सायली पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.

विखे-पाटील यांनी करंजी येथे पुलाची, तसेच ग्रामस्थांच्या घराची, किराणा दुकानाची पाहणी करत नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली. देवराई, तिसगाव येथे शेतपीक व घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेवगाव तालुक्यातील अमरापूरकर व परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या, तक्रारींची लेखी निवेदने स्वीकारली.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, की मागील अनेक वर्षांत झाला नाही एवढा पाऊस या भागात झाला. अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे. पिकांचे सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त गावांतील पंचनामे सरसकट करण्याच्या, पंचनामे तातडीने होण्यासाठी इतर तालुक्यांतील मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

तात्पुरते निवारे उभारा

पावसामुळे ज्यांच्या घराचे नुकसान झाले अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करावी. तेथे अन्न, पाणी, वीज, औषधे उपलब्ध करा. ज्यांची घरे संपूर्ण उद्ध्वस्त झाली, अशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करा, अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

अधिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात येईल, तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असेही विखे पाटील यांनी सांगितले.